Smriti Mandhana: संगीतकार पलाश मुच्छल सोबत स्मृती मानधनाचे लग्न रद्द, सोशल मीडियावर व्हायरल
स्मृती डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेत दिसणार
सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज, सांगलीची सुकन्या स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. पोस्ट करत 'लग्नाचा निर्णय मागे घेतला असून दोन्ही कुटुंबांच्या खासगी आयुष्याचा आदर करावा,' अशी विनंती केली.
तिने पुढे नमूद केले की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत आणि मला वाटते की यावेळी मी याबद्दल बोलणे महत्वाचे आहे. मी एक अतिशय खासगी व्यक्ती आहे आणि मी ते असेच ठेवू इच्छिते. परंतु हे लग्न आता रद्द करण्यात आले आहे हे स्पष्ट करणेमहत्वाचे आहे. कृपया सध्या दोन्ही कुटुंबांच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करा आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी थोडा वेळ द्या, अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.
तसेच तिने पुढे नमूद केले आहे, आपल्या सर्वांचे एक ध्येय असते आणि माझ्यासाठी ते ध्येय नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे राहिले आहे. मला आशा आहे की मी भारतासाठी खेळत राहीन आणि देशासाठी बराच काळ ट्रॉफी जिंकत राहीन. लग्न रद्द करण्यामागील कारणांबाबत कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. स्मृती आणि पलाशने शेअर केलेल्या या पोस्टमुळे लग्न कधी होणार, या चर्चाना मात्र पूर्णविराम लागला आहे. स्मृतीची ही पोस्ट अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाली आहे. स्मृती आता डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरूद्ध मायदेशात होणाऱ्या टी-२० मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
पलाशकडूनही दुजोरा
दरम्यान, पलाश मुच्छल यांनीही आपल्या स्वतंत्र निवेदनात आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. खोट्या व अपमानजनक माहितीचा प्रसार झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दोघांनी सोशल मीडियावरील एकमेकांचे फोटो व पोस्ट्स हटवले असून एकमेकांना अनफॉलो केले आहे.