Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली; विवाह सोहळा ढकलला पुढे
स्मृती मानधनाच्या लग्नात अनपेक्षित वळण
सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या विवाह सोहळ्यात आज अनपेक्षित वळण आले. लग्नाच्या तयारीदरम्यान स्मृती मानधनाचे वडील अचानक अस्वस्थ झाले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता होणारा विवाह सोहळा तातडीने पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
हा प्रकार समडोळी येथील मानधना फार्महाऊसवर घडला. लग्नाची सजावट आणि पाहुण्यांचे आगमन सुरू असतानाच वडिलांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. महेश शहा यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेनंतर स्मृती मानधना आणि तिचे कुटुंब तातडीने रुग्णालयात पोहोचले. कुटुंबाने एकमताने विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या विवाहासाठी संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्यासोबत स्मृतीचा विवाह होणार होता. देशभरातील खेळाडू, बॉलिवूड कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सांगलीत दाखल झाले होते. काही पाहुणे स्थळी पोहोचले होते तर काही मार्गात होते. सध्या पाहुण्यांना परत पाठवण्याचे आणि सजावट हटवण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून क्रिकेटप्रेमी व चाहत्यांनी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.