वडिलांची तब्येत बिघडल्याने स्मृती मानधनाचा विवाह लांबणीवर
वृत्तसंस्था/ सांगली
स्टार भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या रविवारी येथे होणाऱ्या लग्न समारंभाच्या आधी तिचे वडील श्रीनिवास आजारी पडल्याने स्मृती आणि संगीतकार पलाश मुंचल यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
मानधना तिच्या वडिलांशी भावनिकदृष्ट्या खूप जोडलेली आहे. ते तिच्या क्रिकेट प्रवासात सतत आधार देत आलेले आहेत. रविवारी मानधनाचे व्यवस्थापक मिश्रा यांनी सांगितले की, या विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटूच्या वडिलांना रविवारी सकाळीच प्रकृतीच्या गुंतागुंतीला सामोरे जावे लागले.
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना सकाळी नाश्ता करत होते आणि तेव्हाच त्यांची प्रकृती बिघडू लागली. आम्ही वाट पाहत होतो की, ते लवकर बरे होतील. परंतु त्यात सुधारणा झाली नाही. ते निरीक्षणाखाली आहेत, असे मिश्रा म्हणाले. वडिलांच्या प्रकृतीची स्थिती लक्षात घेता मानधनाने लग्न ते बरे होईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टरांनी सांगितले आहे की, मानधनाच्या वडिलांना सध्या ऊग्णालयातच राहावे लागेल. आम्हालाही धक्का बसला आहे आणि आशा आहे की, ते लवकर बरे होतील. हा सर्वांसाठी एक मोठा बाका प्रसंग आहे, असे ते पुढे म्हणाले. स्मृतीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. वडील आधी बरे व्हावेत आणि नंतर लग्न व्हावे अशी तिची इच्छा आहे. मी कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर करण्याची विनंती करतो, असे मिश्रा म्हणाले.