भारताच्या विजयात स्मृती मानधनाचे शतक
इंग्लंडचा 97 धावांनी पराभव, श्री चरणीचे 4 बळी
वृत्तसंस्था / नॉटिंगहॅम
यजमान इंग्लंड आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शनिवारच्या पहिल्या सामन्यात ‘सामनावीर’ स्मृती मानधनाच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 97 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर इंग्लंडचा डाव 14.5 षटकात 113 धावांत आटोपला. संघाची नियमीत कर्णधार हरमनप्रित कौरच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व स्मृती मानधना करीत आहे.
या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने 51 चेंडूत 77 धावांची भागिदारी केली. वर्माने 22 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. शेफाली बाद झाल्यानंतर मानधनाला हर्लिन देवोलने चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 8.3 षटकात 94 धावांची भर घातली. देवोलने 23 चेंडूत 7 चौकारांसह 43 धावा जमविल्या. रिचा घोषने 6 चेंडूत 3 चौकारांसह 12 धावा केल्या. रॉड्रिग्जला खाते उघडता आले नाही. अमनज्यौत कौर आणि दिप्ती शर्मा या अनुक्रमे 3 आणि 7 धावांवर नाबाद राहिल्या. स्मृती मानधनाने 62 चेंडूत 3 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 112 धावा झोडपल्या. ती पाचव्या गड्याच्या रुपात बाद झाली. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 47 धावा जमविल्या. मानधनाने 51 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह शतक पूर्ण केले. भारताचे अर्धशतक 38 चेंडूत, शतक 62 चेंडूत, दीड शतक 87 चेंडूत आणि द्विशतक 116 चेंडूत फलकावर लागले. भारताने 10 षटकाखेर 1 बाद 98 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडतर्फे लॉरेन बेलने 27 धावांत 3 तर अर्लोट आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंटने कप्तानी खेळी करत 42 चेंडूत 10 चौकारांसह 66 धावा जमविल्या. पण ब्रंटला तिच्या साथीदारांकडून चांगली साथ मिळाली नाही. इंग्लंडच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अर्लोटने 10 चेंडूत 1 षटकारासह 12 तर बिमॉन्टने 11 चेंडूत 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. पहिल्या षटकापासूनच इंग्लंडच्या डावाला गळती सुरू झाली. भारताच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. ब्रंट आणि बिमॉन्ट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. भारतातर्फे श्री चरणीने 12 धावांत 4, दिप्ती शर्माने 32 धावांत 2, राधा यादवने 15 धावांत 2 तसेच अमनज्योत कौर आणि अरुंधती रे•ाr यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 58 धावा जमविताना 3 गडी गमविले. 10 षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 5 बाद 78 कशी होती. ब्रंटने आपले अर्धशतक 31 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने झळकविले. इंग्लंडचे अर्धशतक 31 तर शतक 72 चेंडूत नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: भारत 20 षटकात 5 बाद 210 (स्मृती मानधना 112, शेफाली वर्मा 20, देवोल 43, घोष 12, अवांतर 13, बेल 3-27, अर्लोट 1-38, इक्लेस्टोन 1-43), इंग्लंड 14.5 षटकात सर्वबाद 113 (नॅट सिव्हेर ब्रंट 66, अर्लोट 12, बिमॉन्ट 10, अवांतर 7, श्रीचरणी 4-12, दिप्ती शर्मा व राधा यादव प्रत्येकी 2 बळी, अमनज्योत कौर आणि रे•ाr प्रत्येकी 1 बळी)