सुरळीत सुऊवातीनंतर बांगलादेशपुढे श्रीलंकेची कठीण कसोटी
वृत्तसंस्था/ अबुधाबी
हाँगकाँगवर सहज विजय मिळवून उत्साहित झालेल्या बांगलादेशला आज शुक्रवारी आशिया चषकातील गट ‘ब’च्या सामन्यात सहा वेळचा विजेता श्रीलंकेविऊद्ध अधिक कठीण कसोटीचा सामना करावा लागेल. ही लढत गटाचे भवितव्य ठरवण्यात मोठी भूमिका बजावू शकते.
बांगलादेशच्या मोहिमेची सुरुवात चांगली झाली आहे. कारण कर्णधार लिटन दासच्या संघाने बुधवारी हाँगकाँगवर सात गड्यांनी विजय मिळवला. ज्या फरकाने विजय मिळविला गेला तो जरी समाधानकारक असला, तरी या कामगिरीने काही चिंताजनक बाबी, विशेषत: गोलंदाजीमध्ये, उघड केल्या. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि लेगस्पिनर रिशाद हुसेन यांनी बळी घेतले असले, तरी धावाही दिल्या. तथापि, श्रीलंकेविऊद्ध बांगलादेशला या त्रुटी परवडणार नाहीत. चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा एक मजबूत संघ तयार केला आहे, जो वरच्या फळीची मजबुती, मधल्या फळीची ताकद आणि यूएईच्या परिस्थितीनुसार तयार केलेला फिरकी मारा यांचा मेळ घालतो.
पथुम निसांका, कुसल मेंडिस व कुसल पेरेरा हे शीर्षस्थानी स्थिरता प्रदान करतात, तर असलंका, दासुन शनाका आणि कामिंदू मेंडिस हे फलंदाजीची खोली आणि फिनिशिंग क्षमता वाढवतात. श्रीलंकेने मधल्या फळीतील फलंदाज जनित लियानागेलाही परत बोलावले आहे. त्याला तीन वर्षांनी टी-20 मध्ये पुनरागमनाची संधी मिळाली आहे. झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत नाबाद 70 धावा काढणारा हा 30 वर्षीय खेळाडू शनाका आणि चमिका कऊणारत्ने यांच्यासह त्यांच्या वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू पर्यायांची खोली वाढवतो.
हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरलेल्या स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा याच्या पुनरागमनामुळे संघाला आणखी बळकटी मिळाली आहे. यूएईच्या संथ खेळपट्ट्यांवर श्रीलंकेचा हसरंगा, माहेश थीक्षाना आणि दुनिथ वेललागे हा फिरकी मारा प्रभावी ठरू शकतो, तर वेगवान गोलंदाज मथेशा पाथिराना गोलंदाजीत विविधता आणतो. बांगलादेशला लिटन आणि हृदॉय यांच्याकडून फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवण्याची अपेक्षा असेल, तर मुस्तफिजूर रहमानने नवीन चेंडूचा वापर अधिक प्रभावीपणे करावा अशी अपेक्षा असेल.
अफगाणिस्तान (4.700) संघ बांगलादेशपेक्षा नेट रनरेटमध्ये (1.001) खूप पुढे असल्याने शुक्रवारी होणारा सामना अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण गटातून फक्त दोनच संघ पुढे जाऊ शकतात आणि जर तीन संघ समान गुणांवर राहिले, तर ‘एनआरआर’ निर्णायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांवर आता केवळ जिंकण्याचाच नव्हे, तर चांगल्या प्रकारे जिंकण्याचा अतिरिक्त दबाव असेल.
संघ : बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदॉय, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, काझी नुऊल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरिफूल इस्लाम, शैफ उद्दीन.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधर), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल पेरेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शानाका, जेनिथ लियानागे, चमिका कऊणारत्ने, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, माहेश थीक्षाना, दुष्मंथा चमिरा, बिनुरा फर्नांडो, नुवान थुषारा, मथेशा पाथिराना.