For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांजाचा धूर आणि काळजीचा सूर

11:24 AM Mar 22, 2025 IST | Radhika Patil
गांजाचा धूर आणि काळजीचा सूर
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशिद : 

Advertisement

अतिशोयोक्ती अजिबात नाही पण कोल्हापुरात जास्त वर्दळीची नसलेली ठिकाणे, वापरात नसलेल्या इमारती, मैदानांचे कोपरे, फारशी वाहतूक नसलेले रस्ते अशा ठिकाणी डोक्याला डोके लावून बसलेले तिघे चौघे दिसले की ओळखायचे ते गांजा फुकायचे काम चालू आहे. हा अंदाज कदाचित 100 टक्के तंतोतंत नसेल. पण 60 ते 70 टक्के हे वास्तव कोल्हापुरात आहे. एकाने गांजा मळायचा. एकाने सिगारेट मधील तंबाखू काढून त्यात तो भरायचा आणि लायटर पेटवुन गांजाचा झोका आळीपाळीने ओढायचा हे आता अगदी उघड दिसणारे चित्र आहे. या गांजाच्या धुंदीत अंगावर मांस नसलेल्या पोरांनाही नको तितके बळ आले आहे.

गांजाची नशा कमी कमी होत आली की मरगळलेल्या शरीराने घरात, किंवा सार्वजनिक ठिकाणी पाय पोटात घेऊन झोपलेली ही पोर दिसत आहे. पोराला असं पडलेलं पाहून आई-बाबांच्या जीवाची अक्षरश: घालमेल होत आहे. आपलं पोरगं गांजा ओढतोय की कल्पना साध्या भोळ्या आई-बाबांच्या तर्काबाहेरची आहे. पण पोराला रोज त्या धुंदीत पाहून आई-बाबांचे हात पाय गळटले आहेत. पोराला काय सांगायला गेले तर पोराचं गुरगुरणे तर सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. पण कोल्हापुरात या गांजाच्या अधीन झालेल्या पोरांचा अगदी उघड दिसणारा आता वावर आहे. सगळेजणच याच वाटेने जातील असे म्हणण्यातही काही खरे नाही. पण जे गेले ते गांजाच्या झुरक्याशिवाय दिवस काढू शकणार नाहीत इतके आहारी गेल्यासारखी परिस्थिती आहे. आणि त्या तरुणांची गांजाच्या नशेमुळे विचार करण्याची ताकदच हरवली आहे.

Advertisement

वरूणतीर्थ मैदानाचा एक कोपरा हे एक केवळ प्रतीकात्मक उदाहरण आहे या मैदानावर फुटबॉल रंगला. तिथला 18 फुट उंच महात्मा गांधींचा पुतळा अहिंसा आणि सत्य वचनाचा संदेश देत राहिला. नाही म्हटलं तरी मैदानावर फिरायला येणाऱ्या ज्येष्ठांचा दबदबाही मैदानावर जाणवत राहिला. पण आता विशिष्ट कोपरा फक्त झुरके मारण्यासाठी आहे तो कायम गजबजलेला आहे. तिथली पोरं पेठेतील नक्कीच नाहीत. पण आसपासच्या परिसरातील आहेत. कारण येथे झुरका घेण्यासाठी अगदी खुले वातावरण आहे. चेहरा ओळखता येणार नाही असं इतका अंधार आहे. शिवाजी पेठेतील ज्या दौलु मास्तरांनी बहुजन समाजातील पोरं शिकावीत म्हणून शंभर वर्षांपूर्वी शाळा काढली. उचल बांगडी करून पोरं शाळेत नेण्याची पद्धत अवलंबली. एक चांगली पिढी त्यांनी घडवली त्याच दगडू मास्तरांच्या पुतळ्याजवळ बसणारी ही टोळकी पाहिली तर अक्षरश? धसका बसेल अशी परिस्थिती आहे.

 दसरा चौकात शाहू स्मारकच्या बाजूला एक कोपरा आहे. तिथे दगडी कट्टा आहे. रात्री दसरा चौकातील वाहनांची ये जा चालू असते. पण कोपऱ्यात हे कोण बसलय, ‘तिथे काय चाललंय याकडे कोणी लक्ष देत नाही आणि येथेच गांजा ओढणाऱ्यांचे फावले आहे

कोल्हापुरात गांजा धार्मिक विधीसाठी म्हणजे ताई बाईच्या जत्रेसाठी वापरण्याची पद्धत आहे. पाच ग्रॅम दहा ग्रॅम गांजाची पुडी त्यासाठी विकत मिळते. त्या पुडीत बऱ्याच वेळा गांजा ऐवजी नारळाची अगदी पातळ अशी शेंडी घातली जाते. पण आता पाच ग्रॅम गांजा म्हणजे फार काही विशेष राहिलेले नाही. किलोने गांजा कोल्हापुरात मिळू लागला आहे. निपाणी, सांगली, मिरज व पर प्रांतातून काही विक्रेत्यांनी कोल्हापूरला प्राधान्य दिले आहे. पिशवीतून सहजपणे गांजा आणता येतो

  • पोलिस खाक्या गरजेचा

या सर्व घडामोडीत मग पोलीस काय करतात हा प्रत्येकाच्या मनात साहजिकच येणारा प्रश्न आहे. गांजा मावा कोल्हापुरात कोठे मिळतो हे पोलीस दलातील डी बी व एलसीबी या विभागाला माहीत नाही असे होऊ शकत नाही. पण अलीकडे मात्र पोलीस यंत्रणा नक्कीच सक्रिय झाली आहे. आता त्यांना गांजा गांजाची वाहतूक करणारे दिसू लागले आहेत. कारवाई चालू झाली आहे. पूर्वी दहा ग्रॅम पंधरा ग्रॅम गांजा पकडणारे आता किलो किलो भर गांजा पकडू लागले आहेत. आता अचानक गांजा पोलिसांना कसा काय दिसू लागला हा देखील या निमित्ताने खोचक प्रश्न विचारला जात आहे .

  • सामाजिक दबावाचीही गरज .....

गांजा संदर्भात पोलिसांची कारवाई चालू आहे. किलो किलोच्या पटीत गांजा सापडतो आहे. पण सर्व पोलिसांवर सोडून आपण तटस्थ राहणे या काळात योग्य नाही. कोल्हापुरातील पेठापेठा, तालीम मंडळात अजूनही ज्यांच्या शब्दाला वजन आहे. मान आहे त्यांनीही दक्ष राहून या प्रकारांना धाडसाने रोखण्याची गरज आहे. कारण कोल्हापुरातली एक मोठी पिढी या गांजाच्या मोहात बाद होण्याची भीती आहे.

                                                                                  आमदार राजेश क्षीरसागर

  • गांजा अतिसेवनाने वेड लागते

सगळेच गांजा ओढतात असे नाही. पण गेल्या काही महिन्यात गांजा ओढणाऱ्यांचे प्रमाण नक्कीच वाढलेले आहे. आमच्याकडे उपचाराला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आम्ही औषध तर देतोच पण त्याला समजावून सांगून या व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. गांजाच्या अतिसेवनाने वेडेपणाच्या स्थितीला तो तरुण येऊन पोहोचतो. साऱ्या कुटुंबाला तो अडचणीत आणतो. पण तरीही औषधोपचार, कौन्सिलिंग या आधारावर व्यसनाधीन तरुण नक्कीच बाहेर पडू शकतो.

     विशाल पाटील मनोविकार तज्ञ, असिस्टंट प्रोफेसर राजश्री शाहू वैद्यकीय महाविद्यालय

  •  पोलिस गस्त जरूरीची..

पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याच्या कट्ट्यावर बसून गांजा ओढत अनेक तरुण बसतात. त्यांना काही समजावून सांगायला गेलं तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात या व्यसनात बुधवार पेठेतील तरुण अडकू नयेत म्हणून आम्ही पेठ व तालमीच्या पातळीवर दक्ष आहोत.पोलिसांनी रात्री आठ नंतर बुधवार पेठ ते पंचगंगा स्मशानभूमी या रस्त्यावर ठराविक अंतराने गस्त घालावी.

                                                                सुशांत भांदिगरे, कार्यकर्ता जुना बुधवार पेठ.

  • गांजा म्हणजे नेमके काय!

भारतासह बऱ्याच देशांमध्ये गांजावर बंदी घालण्यात आली आहे, परंतु अनेक देशांमध्ये तो पूर्णपणे कायदेशीर आहे. गांजाला इंग्रजीमध्ये कॅनाबिस (Cannabis) म्हणतात. भांग फुलांपासून गांजा बनवला जातो. सामान्यपणे गांजाचे सिगारेटसारखे धूम्रपान केले जाते. तर बरेच लोक म्हणतात की ते खाल्ले ही जाऊ शकते आणि तसेच विरघळून पिताही येते. भारतात गांजाला एनडीपीएस अंतर्गत आणण्याचे सर्वात मोठे कारण ते एक मनोसक्रिय मादक (Psychoactive Drug) होते. गांजा धूम्रपान केल्यानंतर आपल्या मेंदूत बर्याच प्रकारच्या प्रक्रिया सुरु होतात. वास्तविक, कॅनाबिसच्या रोपामध्ये सुमारे 150 प्रकारचे कॅनाबिनॉइड्स (Cannabinoids) आढळतात. कॅनाबिनॉइड्स म्हणजे आपण सोप्या भाषेत याला रसायन म्हणू शकता. कॅनाबिस वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या 150 रसायनांपैकी अशी दोन रसायने देखील आहेत ज्याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो. THC आणि  CBD  अशी या रसायनांची नावे आहेत.

  • कायदा काय सांगतो

NDPS या कायद्याद्वारे, अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गांजा, चरस, ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारख्या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाची निर्मिती, वाहतूक, बाळगणे, विक्री करण्राया व्यक्तींवर कारवाई केली जाते. या कायद्याच्या कलम 20 नुसार, गांजाची बेकायदेशीरपणे लागवड केल्यास 10 वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. NDPS कायद्यानुसार, भारतात गांजाची लागवड करता येत नसली तरी, राज्य सरकारांना याप्रकरणी कायदे तयार करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.