फेब्रुवारीत स्मार्टफोन निर्यात 54 टक्के वाढली
नवी दिल्ली’:
भारतातील स्मार्ट फोनची निर्यात 1.75 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची झाली असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान वरील कामगिरी नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेमध्ये स्मार्ट फोनची निर्यात 54 टक्के वाढीव झाली आहे.
1.68 लाख कोटीचा टप्पा गाठणार
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये स्मार्ट फोनची निर्यात 1.68 लाख कोटींचा टप्पा पार करेल, असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाहता स्मार्ट फोनच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. पीएलआय या सरकारच्या सवलतीच्या योजनेचा लाभ स्मार्ट फोन निर्मात्या कंपन्यांनी घेतला असल्याचे दिसून आले आहे.
अॅपल, सॅमसंगची बाजी
निर्यातीत अॅपल आणि सॅमसंग या कंपन्यांनी 2024 मध्ये बाजी मारली आहे. एकंदर शिपमेंटमध्ये या दोन कंपन्यांचा वाटा 94 टक्के इतका आहे. 2025 मध्ये स्मार्टफोन निर्मितीत दोन अंकी विकास साधण्याची शक्यता सांगितली जात आहे. 2024 मध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही वेगवान वाढणारी स्मार्टफोन निर्माती कंपनी राहिली आहे. आयफोन 15 आणि आयफोन 16 फोनची निर्मिती करण्यात कंपनीचा वाटा महत्त्वपूर्ण राहिलाय. आता कंपनी ढोलेरा, गुजरातमध्ये सेमीकंडक्टर व्यवसायात उतरली आहे. डिक्सननेही स्मार्टफोन निर्मितीसह निर्यातीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. वर्षाच्या आधारावर स्मार्टफोन निर्मितीत 39 टक्के वाढ कंपनीने नोंदवली आहे.
फेब्रुवारीत व्यापार निर्यात घसरली
याच दरम्यान भारतातील व्यापार निर्यात मात्र फेब्रुवारीत सलग 4 महिन्यात घसरलेली दिसून आली. 36.91 अब्ज डॉलर्सची व्यापार निर्यात भारताने फेब्रुवारीत केली आहे. निर्यातीमध्ये 10 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. सोबत 16 टक्के आयातीमध्ये घसरण झाली असून भारताने 50.96 अब्ज डॉलर्सच्या वस्तुंची आयात केली आहे.