For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवाहकाच्या हातात स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मशीन

06:19 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसवाहकाच्या हातात  स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मशीन
Advertisement

प्रायोगिक तत्त्वावर प्रणालीला चालना : सुट्या पैशांची कटकट थांबणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बसचा प्रवास आता ऑनलाईन होऊ लागला आहे. बसवाहकाच्या हातात स्मार्ट इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन दिली जाणार आहे. राज्यातील काही बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली सुरू झाली आहे. लवकरच बेळगाव विभागातदेखील या प्रणालीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बसचे तिकीट काढणे आता सोयीस्कर होणार आहे.

Advertisement

सद्यस्थितीत बसमध्ये यूपीआय प्रणाली सुरू आहे. त्याचबरोबर आता बसवाहकाकडे इलेक्ट्रिक मशीन दिली जाणार आहे. बसवाहकाच्या गळ्यात क्यूआर कोड प्रिंटआऊटदेखील दिसणार आहे. याद्वारे स्कॅन करून तिकिटाची रक्कम प्रवाशांना देता येणार आहे. याद्वारे फोन पे, गुगल पेसह युपीआय आधारित पेमेंट प्राप्त झाल्यानंतर संबंधित आगाराच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

सध्या नियमित धावणाऱ्या एक्स्प्रेस बसमध्ये व शहरांतर्गत धावणाऱ्या एकूण 150 बसेसमध्ये ही नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन प्रणाली सुरू झाली आहे. शिवाय सध्या सुरू असलेल्या शक्ती योजनेमुळे या प्रणालीत काही अडचणी येतात का? याची चाचपणीदेखील केली जात आहे.

परिवहनच्या बसमधून तिकीट मिळवून प्रवास करणे ही समस्या बनू लागली आहे. गर्दीच्यावेळी तिकीट काढणेही त्रासदायक ठरत असते. अशा परिस्थितीत स्मार्ट इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन उपयुक्त ठरणार आहे. शिवाय ही प्रणाली वापरून कॅशलेस तिकीट सुविधेवर भर दिला जाणार आहे.

बसचा प्रवास करताना सुट्या पैशावरून बसवाहक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वादवादीचे प्रकारही घडत असतात. काहीवेळेला सुटे पैसे नसले की बसवाहक तिकिटाच्या पाठीमागे रक्कम लिहून देतात. मात्र गर्दी आणि इतर कारणामुळे प्रवाशाला पैशाविना घरी परतावे लागते. मात्र आता इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमुळे या साऱ्यांना आळा बसणार आहे

Advertisement
Tags :

.