For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहकारी बँकांमुळे लघुउद्योग भरभराटीला

06:35 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहकारी बँकांमुळे लघुउद्योग भरभराटीला
Advertisement

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन : दैवज्ञ सहकार बँकेचा सुवर्णमहोत्सव उत्साहात

Advertisement

बेळगाव/प्रतिनिधी

लघुउद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जातात. अधिकाधिक कारागीर तसेच सेवा या लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करून त्यांची भरभराट करण्यात सहकारी बँकांचे मोठे योगदान आहे. सरकारी बँकांना काही वेळा मर्यादा येतात, त्यावेळी सहकारी बँकाच उद्योगांच्या पाठीशी कणखरपणे उभ्या राहतात. दैवज्ञ बँकेने आजवर अनेक उद्योगांना अर्थसाह्य करून उभे केले. त्यामुळेच हा यशाचा टप्पा गाठू शकले, असे गौरदगार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले.

Advertisement

दैवज्ञ सहकार बँकेचा सुवर्ण महोत्सव सोहळा शनिवारी मराठा मंदिरच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश प्रभू यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर बँकेचे चेअरमन उदयशंकर भट, व्हाईस चेअरमन मंजुनाथ शेट, सुवर्ण महोत्सवी कमिटीचे चेअरमन राजेश अणवेकर, उद्योजक सचिन सबनीस, दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सुरेश प्रभू यांनी दैवज्ञ बँकेच्या प्रगतीचे कौतुक करत दैवज्ञ समाज म्हटले की सोन्याच्या दागिन्यांची आठवण होते. आज देशातून सर्वाधिक निर्यात ही जेम्स अँड ज्वेलरीची होते. उद्योग जतन करण्यासाठी कौशल्य निर्मिती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकेने आता प्रत्येक तालुक्यावर लक्ष देऊन तेथील लोकांच्या गरजा समजून त्याप्रमाणे कर्ज पुरवठा करत देशाचा विकास करावा. आजवर नागरिकांनी पारदर्शक व्यवहारामुळे 24 कॅरेट सोन्याप्रमाणे बँकेवर विश्वास ठेवला आहे. हा विश्वास भविष्यातही हे संचालक सार्थ ठरवतील, असे त्यांनी सांगितले.

चेअरमन उदयशंकर भट यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सध्या बेळगावमध्ये चार तर धारवाड व कारवार येथे प्रत्येकी एक शाखा आहे. पुढील काळात महाराष्ट्र व गोवा येथेही बँकेचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. यावर्षी पाच टक्के वाढीव लाभांश तसेच ग्राहकांच्या घरापर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉ. चेअरमन मंजुनाथ शेट यांनी बँकेच्या स्थापनेसंदर्भात माहिती दिली. कर्नाटकातील एक नामवंत बँक म्हणून दैवज्ञ सहकार बँक ओळखली जाते. छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. बँकेने आपला प्रगतीचा आलेख कायम चढताच ठेवला असल्याने ग्राहकांचा विश्वास नेहमीच बँकेच्या पाठीशी राहिला आहे. यापुढेही ग्राहकांनी असाच विश्वास बँकेवर ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दैवज्ञ सहकार बँकेच्यावतीने सुरेश प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. चित्रफितीच्या माध्यमातून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते जुने संचालक, त्यांचे नातेवाईक व विद्यमान संचालकांचा सत्कार करण्यात आला. दयानंद नेतलकर यांनी बँकेच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी संचालक सदानंद रेवणकर, जीवन एस. वेर्णेकर, कल्पना अणवेकर, समीर अणवेकर, जीवन डी. वेर्णेकर, माणिक अणवेकर, गणेश वेर्णेकर, विनिता शेट, रघुनाथ शेजेकान, दयानंद नेतलकर, रंगनाथ सुंकसाळकर, प्रधान व्यवस्थापक पद्मनाभ शेट यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, प्राचार्य व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर अणवेकर, राजेश अणवेकर यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन विनय कुलकर्णी यांनी केले.

सुरेश प्रभू यांच्यामुळे बेळगावची विमानभरारी

बेळगाव विमानतळ हे देशातील सर्वात जुने विमानतळ असले तरी 2018 मध्ये केवळ एकच विमानफेरी कार्यरत होती. उडान 3 योजनेमध्ये समावेश व्हावा यासाठी बेळगावच्या नागरिकांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी नागरी उ•ाण खाते सुरेश प्रभू यांच्याकडे होते. ते म्हैसूर येथे आले असताना बेळगावच्या काही उद्योजकांनी त्यांच्याकडे ही मागणी लावून धरली. त्यामुळेच शेवटच्या क्षणी उडान योजनेत बेळगावचा समावेश झाला. सध्या बेळगावमधून महिन्याला 30 ते 35 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. याचे संपूर्ण श्रेय सुरेश प्रभू यांना जाते, असे गौरवोद्गार उद्योजक सचिन सबनीस यांनी काढले.

Advertisement
Tags :

.