For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छोटा पॅकेट, बडा धमाका !

06:58 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
छोटा पॅकेट  बडा धमाका
Advertisement

 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे 35 चेंडूत शतक : राजस्थानचा गुजरातवर 8 गड्यांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

आयपीएलच्या इतिहासात आजवरचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने आपल्या तिसऱ्याच सामन्यात नवा इतिहास रचला. जयपूरच्या मैदानात गुजरातविरुद्ध सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत वैभव सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकले. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमधलं हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरलं. त्याच्या या शतकी खेळीत 7 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. याआधी बंगलुरुकडून खेळण्राया ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकले होते. वैभव व यशस्वी जैस्वालच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थानने गुजरातवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Advertisement

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरातने विजयासाठी दिलेले 210 धावांचे लक्ष्य राजस्थानने अवघ्या 15.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. प्ले ऑफमधील स्थान राखण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल यांनी 166 धावांची सलामी दिली. या जोडीने गुजरातच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना चौफेर फटकेबाजी केली.

वेगवान अर्धशतक अन् शतकही

14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात इतिहास रचला आहे. वैभवने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, त्याच पद्धतीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी केली. आधी वैभवने 17 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने आपले पहिले अर्धशतक ठोकले. हे या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे. त्यानंतर त्याने  38 चेंडूत 101 धावांची खेळी केली. वैभव सूर्यवंशीने 265.78 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान, त्याने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 35 चेंडू घेतले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने हे शतक झळकावले होते. आता 15 वर्षांनंतर, वैभव सूर्यवंशीने त्याला मागे टाकले आहे. यादरम्यान, यशस्वी जैस्वालने त्याला साथ देताना 40 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह नाबाद 70 धावा केल्या. शतकानंतर वैभव लगेचच बाद झाला. रशीद खानला 4 धावा करता आल्या. यानंतर जैस्वालने कर्णधार रियान परागसोबत संघाला 15.5 षटकांतच विजय मिळवून दिला. पराग 32 धावांवर नाबाद राहिला.

गुजरातला पराभवाचा धक्का

प्रारंभी, नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या डावाची सुरुवात दमदार झाली. साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल यांनी 93 धावांची सलामी दिली. 39 धावांवर साईला तिक्षणाने बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला. यानंतर गिलने जोस बटलरला सोबतीला घेत संघाचा डाव सावरला. गिलने अर्धशतकी खेळी साकारताना 50 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह 84 धावांचे योगदान दिले. बटलरने 26 चेंडूत 50 धावा फटकावल्या. या जोरावर गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावत 209 धावा केल्या. दोनशेचा टप्पा गाठल्यानंतरही गुजरातच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 20 षटकांत 4 बाद 209 (साई सुदर्शन 39, शुभमन गिल 84, जोस बटलर 50, वॉशिग्टंन सुंदर 13, तिक्षणा 2 बळी, आर्चर व संदीप शर्मा प्रत्येकी एक बळी)

राजस्थान रॉयल्स 15.5 षटकांत 2 बाद 212 (यशस्वी जैस्वाल 70, वैभव सूर्यवंशी 38 चेंडूत 7 चौकार व 11 षटकारासह 101, नितीश राणा 4, रियान पराग नाबाद 32, प्रसिध्द कृष्णा व रशीद खान प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.