लघु उद्योजकांना रॅम्प योजनेतून प्रोत्साहन
डीआयसीचे सत्यनारायण भट यांची माहिती
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील लघु उद्योजकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, उत्पादने यांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. भारत सरकारच्या रॅम्प योजनेंतर्गत लघु उद्योगांना डिझाईन निर्यात ऑनलाईन मार्केटिंग, गुणवत्ता तसेच इतर सवलती देण्याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे जिल्हा उद्योगकेंद्राचे (डीआयसी) सहसंचालक सत्यनारायण भट यांनी सांगितले. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स, बेळगाव जिल्हा औद्योगिक केंद्र (डीआयसी) व बेंगळूर येथील व्हिजन कर्नाटक फौंडेशनच्यावतीने नुकतेच एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी यांच्यासह इतर उपस्थित होते. कार्यक्रमाला बेळगाव शहरातील 80 हून अधिक लघु उद्योजक उपस्थित होते. लघु उद्योग भारती, लघु उद्योजक संघटना यासह इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केले.