स्लोव्हेनियाची नेदरलँड्सवर आघाडी
वृत्तसंस्था / बेंगळूर
बिली जिन किंग चषक सांघिक महिलांच्या ग गटातील प्ले ऑफ लढतीमध्ये स्लोव्हेनियाने नेदरलँड्सवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. स्लोव्हेनियाच्या तेमारा झिदानसेक आणि जुआन यांनी आपले एकेरीचे सामने जिंकले आहेत.
पहिल्या एकेरी सामन्यात स्लोव्हेनियाच्या झिदानसेकने नेदरलँड्सच्या अरांत्झा रूसचा 6-1, 7-6 (8-6) असा पराभव करत आपल्या संघाला विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्लोव्हेनियाच्या केजा जुआनने नेदरलँड्सच्या सुझान लॅमेन्सवर 7-6 (7-5), 4-6, 6-3 अशी मात करत स्लोव्हेनियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा दुसरा एकेरी सामना अडीच तास चालला होता. त्यानंतर झालेल्या महिला दुहेरीच्या सामन्यात नेदरलँड्सच्या लॅमेन्स आणि स्व्रुर्स या जोडीने स्लोव्हेनियाच्या डेलीला जेकुपोव्हीक आणि निका रॅडीसीक यांचा 6-4, 6-0 असा पराभव केला. आता स्लोव्हेनियाची पुढील लढत यजमान भारताबरोबर होणार आहे. या लढतीत स्लोव्हेनियाने विजय मिळविल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिली जिन किंग चषक टेनिस स्पर्धेतील आपले तिकीट निश्चित करतील