गोफण नाही चिमणी- पाखरं हाकणीला...! बांधावरूनचं पिक राखण..माचवा झाला दुर्मिळ
आकाश पवार : भिगवण
रब्बी हंगामातील मुख्य ज्वारीचे पीक आता हुरड्यात आहे. इंदापूर तालुक्यातील शेतशिवारातील बळीराजा पिकाचे पाखरांपासून संरक्षण करण्यात व्यस्त रहात आहेत. काही ठिकाणी ज्वारीचे पिक काढणिला आले असून चिमणी पाखरांची गर्दी शेतशिवारावर दिसू लागली आहे. हा किलबिलाट हाकलण्यासाठी व पिकाची राखण करण्यासाठी तयार करण्यात येणारा माचवा आता दुर्मीळ झाला आहे. शेताच्या बांधावरूनच आता पिकाची राखण केली जात असून शेतकऱ्यांचे शस्त्र म्हणून ओळख असणारी गोफण आता दिसेनासी झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव, डाळज नं.१,२,३ कुंभारगाव, पोंधवडी,भिगवण मदनवाडी, तक्रारवाडी डिकसळ या भागात उजनी गाळपेर क्षेत्रात यावर्षी ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले गेले आहे. रब्बी हंगामाच्या सुरवातीस पेरणी केलेल्या पिकाला आता दाणा भरू लागला आहे. ज्वारीचे दाणे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिमणी पाखरे येऊ लागली आहेत. शेतकरी या पिकाची राखण करताना दिसू लागली आहेत. काही ठिकाणी या पिकाची काढणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्वारीच्या पिकात माचवा करून पिकाची राखण करण्याचे चित्र आता या परीसरात दुर्मिळ झाले आहे.
गोफणीला मागणी नाही...
रब्बी हंगामातील ज्वारी चे पीक राखणीला आले आहे. शेतकरी आता बांधावर उभा राहून त्याची राखण करीत आहे. आता गोफण देखील दुर्मिळ झाली आहे. प्रत्येक गावच्या आठवडे बाजारात गोफण विक्रीस येत होती. परंतू ती आता दुर्मिळ झाली आहे. कारण ज्वारीचे पीक कमी झाले आहे. पर्यायाने गोफणीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गोफण देखील तयार केल्या जात नाहीत.
ज्वारीची भाकरी महाग होणार...
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्यामुळे गाळपेर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले आहे.पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने इंदापूर तालुक्यात सर्व भागात ज्वारी चे पीक घेण्यात आले नाही. सध्या ज्वारीचे पीक कणसे भरण्याच्या तयारीत आहेत. कमी पावसाच्या प्रमाणामुळे ज्वारी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. त्यांनी हे पीक घेतले आहे. कमी अधीक थंडीचे प्रमाण झाल्याने त्याचा परीणाम या पिकावर झाला आहे. परिणामी ज्वारीची आवक कमीच राहणार आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत राहून ज्वारीची भाकरी महाग होणार असल्याची चिन्ह भिगवणचे आडतदार रणजित जगदाळे यांनी सांगितले.
बदलत्या वातावरणाचा परीणाम ज्वारी पिकावर झाला आहे. अधिक काळ धुके पडल्याने काही ठिकाणी ज्वारीच्या गोंडे लाल झाले आहेत. त्यातून या भागात बाजरीचे पिक लाल होतील. तर मागास बाजरीचे पिक चांगले आहे. त्यामुळे येथे पांढरी व पिवळ्या रंगाच्या शुभ्र बाजरीचे पिक तयार होईल. असे भिगवण येथील शेतकरी रामभाऊ कदम यांनी सांगितले.