काटामारी करणाऱ्या भात खरेदी दलालाला दणका
कडोली येथे कष्टाच्या भाकरीवर डल्ला मारणाऱ्याला घडविली अद्दल : वजनकाटा केला जप्त, शेतकऱ्यांची जागरुकता
वार्ताहर /कडोली
सध्या सुगीचा हंगाम संपला असून, भात खरेदीसाठी तालुक्यातील गावामध्ये दलालांचे पेव फुटले आहे. कडोली येथे भात खरेदी करणाऱ्या दलालाकडून खुलेआम काटामारी करत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी उघडकीस आणून दलालाला उघडे पाडले आहे. घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देऊन दलालाला अधिकाऱ्यांच्या हवाली केले. अधिकाऱ्यांनी वजनकाटा जप्त केला. यामुळे अनेक वर्षापासून होणारी काटामारी अखेर उघडकीस आली. या प्रकारामुळे कडोली परिसरात खळबळ उडाली असून, भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता वर्षभर काबाडकष्ट करून बळीराजा पिके घेतो. पिके घेतल्यानंतर आपल्या गरजेसाठी भात किंवा इतर उत्पादनांची विक्री करतो. कडोलीमध्ये सध्या सुगीचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे शेतकरी भात विक्री करू लागले आहेत. यावर्षी पावसाअभावी भात उत्पादनात मोठी घट झाली आहे. रात्रभर जागरण करून पंपसेटद्वारे पाणी उपसा करून थोड्या प्रमाणात भात पिकविण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाअभावी सर्व पिके नुकसानीत आली आहेत. अशा परिस्थितीत जर कोणी चोरी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला तर काय परिणाम होतो याची प्रचिती गुरुवारी कडोली येथे पाहावयास मिळाली. याची दखल भात व्यापाऱ्यांनी घेऊन यापुढे तरी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या भाकरीवर डल्ला मारू नये.
अन् व्यापाऱ्याने काढला पळ
गुरुवारी कडोली गावात आलेल्या फक्त भात खरेदी करणाऱ्या दलालाने काटामारी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर शेतकऱ्याने गावातील अन्य दोन वजनकाटे आणून शहानिशा केली. त्यावेळी एका पोत्यामागे हा दलाल 4 ते 5 किलो भात चोरी करत असल्याचे कळले आणि तातडीने ही माहिती अन्य शेतकऱ्यांना कळली. परिणामी घटनास्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले आणि हे पाहून भात व्यापाऱ्याने पळ काढला.
शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबवा
परंतु यावर शेतकरी गप्प राहिले नाहीत तर काकती विभाग सर्कल सतीश बिजगती, गाव तलाठी मुल्ला, वजनकाटा निरीक्षक एस. बी. मगावी यांना घटनास्थळी बोलावून झाल्या प्रकाराची माहिती दिली. ग्रामीण भागातील वजनकाट्यांची तपासणी होत नसल्याने शेतकऱ्यांना फसविले जात आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी केली. यावेळी संबंधित दलालावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
दलालावर कारवाई करण्याचे आश्वासन
या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आश्वासन वजनकाटा निरीक्षक एस. बी. मगावी यांनी देऊन वजनकाटा ताब्यात घेतला. शिवाय त्या दलालावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रयत संघाचे नेते आप्पया देसाई, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.