एसएल नारायणनचा विजय
वृत्तसंस्था/ पणजी
भारताच्या एसएल नारायणनने दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्हन रोजसचा पहिल्या टायब्रेक सेटमध्ये पराभव करून फिडे विश्वचषक स्पर्धेच्या 128 खेळाडूंच्या फेरीत स्थान मिळविणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
जलद प्रकारातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नारायणनने पहिल्या डावात काळ्या मोहरांनी खेळताना सिसिलियन डिफेंसचा अवलंब केला. त्याने योजनाबद्ध खेळ करीत स्टीव्हनचा बचाव भेदला आणि नंतर दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळताना 22 चालीत शानदार विजय मिळविला. अन्य एका सामन्यात दीप्तायन घोषने चीनच्या पेंग झिऑनग्लियनचा पराभव केला. टायब्रेकरच्या पहिल्या सेटमधील दोन्ही डाव दीप्तायनने जिंकत आगेकूच केली. कोलकात्याच्या या खेळाडूने पहिल्या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळताना पेंगने केलेल्या चुकीचा लाभ घेत विजय मिळविला. दीप्तायनला या स्पर्धेत स्थान मिळेल, असे वाटले नव्हते. पण यजमान देश असल्याने जास्त जागा मिळाल्याने त्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. तो दडपणाखाली होता. पण त्याने तसे दर्शविले नाही. दोन्ही डावांत त्याने मिळालेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेत शानदार विजय मिळवला. पुढच्या फेरीत त्याचे प्रदर्शन कसे होते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
पहिल्या फेरीचे निकाल : व्ही. प्रणव विवि अॅला एडिन बुलरेन्स 2-0, रौनक साधवानी विवि डॅनियल बॅरिश 1.5-0.5, एम. प्रणेश विवि अखमेदिनोव्ह 1.5-05. याशिवाय कार्तिक वेंकटरमन, सूर्यशेखर गांगुली यांनीही विजय मिळविले.