भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात "त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग' कार्यान्वित
ओटवणे । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात "त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग' कार्यान्वित करण्यात आला असून या विभागाचे लोकार्पण बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलचे डॉ महेश सावळगीमठ यांच्याहस्ते करण्यात आले. समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत असलेले प्रसिद्ध डॉ प्रविणकुमार ठाकरे हे या त्वचाविकार बाह्य रुग्ण विभागात त्वचा रुग्णांची तपासणी करून चिकित्सा करणार आहेत. डॉ ठाकरे यांनी नागपूर विद्यापीठातून एम्. डी. पर्यंतचे शिक्षण घेतले असून पुणे येथील सिम्बायोसिस विद्यापीठातून पी जी डिप्लोमा इन मेडिकोलिगल स्टडीज पूर्ण केले आहे. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाने आतापर्यंत अनेक रुग्णांची सेवा केली आहे.पूर्वी सुतिकागृह म्हणून परिचित असलेले हे रुग्णालय आज विविधांगी चिकित्सा प्रणालीमुळे सर्वांना परिचित आहे.या महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स शल्यचिकित्सा, कायचिकित्सा, कान, नाक, घसा व नेत्र विकार, स्त्रीरोग व प्रसूती तसेच पंचकर्म या विभागांच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे पवित्र कार्य मनोभावे करीत आहेत. या सेवेत अजुन त्वचा रोग चिकित्सा या बाह्य रुग्ण विभागाची जोड मिळाली आहे. या बाह्य रुग्ण विभागात मुख्यत्वे आयुर्वेद चिकित्सापद्धतीने जुनाट तसेच तात्कालिक त्वचा विकारांची चिकित्सा केल्या जाणार आहेत. डॉ प्रविणकुमार ठाकरे हे त्वचारोग रुग्णांसाठी मंगळवार, बुधवार, गुरुवारी या दिवशी सकाळी १० ते १२:३० पर्यंत बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असणार आहेत. या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ विकास कठाणे यांनी केले आहे.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय दळवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ नंदादीप चोडणकर, डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ विशाल पाटील, डॉ ललीतकुमार विठलानी, डॉ रवी गोळघाटे, डॉ राजेंद्र पाटील, डॉ मुग्धा ठाकरे, डॉ शीतल पाटील आदी उपस्थित होते.