हक्कपत्रे वितरणाची सहावी गॅरंटी योजना
प्रतिनिधी/ बेंगळूर
हक्कपत्रे वितरण करणारे कर्नाटक हे देशातील पहिले रायि असावे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जमिनीचे मालकी हक्कपत्रे देऊन जनतेसाठी सहावी गॅरंटी योजना लागू केली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. आम्ही पाच गॅरंटी योजनांबरोबरच गरिबांना हक्कपत्रे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज जात किंवा धर्माचा विचार न करता 1 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हक्कपत्रे वितरित करत आहे, असेही ते म्हणाले.
राज्य काँग्रेस सरकारला द्विवर्षपूर्ती झाल्याबद्दल महसूल खात्याने मंगळवारी विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट येथे ‘समर्पण संकल्प’ मेळावा आयोजित केला. या कार्यक्रमात 1,11,111 लाभार्थ्यांना मालमत्तेच्या हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, हक्कपत्रे मिळवत असलेल्या कुटुंबांकडे मागील दहा वर्षांपासून जमिनीसंबंधी कोणतीही कागदपत्रे नव्हती. ही बाब समजल्यानंतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करून हक्कपत्रे वितरणाची सहावी गॅरंटी योजना जारी केली आहे. 1 लाख कुटुंबांना आम्ही हक्कपत्रे दिली आहेत. हे इंदिरा गांधी यांचेदेखील स्वप्न होते. आज ते पूर्ण झाले आहे, असेही ते म्हणाले.
142 आश्वासनांची पूर्तता : सिद्धरामय्या
विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही दिलेल्या आश्वासनांपैकी पाच गॅरंटी योजनांसह 142 आश्वासनांची पुर्तता केली आहे. पुढील तीन वर्षात उर्वरित आश्वासने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. पहिल्या वेळेस मी मुख्यमंत्री बनलो होतो तेव्हा 165 पैकी 158 आश्वासनांची पुर्तता केली होती. शिवाय जाहीरमान्यात समाविष्ट नसलेल्या नव्या 30 कार्यक्रमांची आखणी करून अंमलबजावणी केली होती, असे ते म्हणाले.
पक्ष सत्तेवर असेपर्यंत ‘गॅरंटी’ कायम : शिवकुमार
आम्हाला सत्तेवर आणून राज्याची सेवा करण्याची संधी दिलेल्या जनतेचे ऋण फेडण्यासाठी सरकारने सहावी ‘भू-गॅरंटी’ योजना जारी केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार पक्ष सत्तेवर असेपर्यंत राज्यातील गॅरंटी योजना स्थगित करणार नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. आम्ही येथे सरकारच्या द्विवर्षपूर्तीसाठी आलेलो नाही. राज्यातील जनतेचे ऋण फेडण्यासाठी समर्पण संकल्प कार्यक्रम करत आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता म्हणून पाच गॅरंटी योजनांसह इतर योजनाही जारी केल्या आहेत, असे ते म्हणाले.
सुरक्षा न दिल्याने पहलगाममध्ये 26 निष्पापांची हत्या : खर्गे
मोदी सरकारने सुरक्षा न दिल्यानेच पहलगाममध्ये भारतातील 26 निष्पाप लोकांची हत्या झाली. पर्यटकांना पोलीस, सीमा सुरक्षा दलाची सुरक्षा न पुरविल्याने ही घटना घडली आहे. याला मोदी सरकार कारणीभॅत आहे. परंतु, याविषयी नरेंद्र मोदींनी किंचितही वाच्यता केलेली नाही. मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही, अशी परखड टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. भारताविरोधात कारस्थाने करणे हे पाकिस्तानचे नेहमीचेच काम आहे. चीनच्या पाठिंब्यावर ते आमच्यावर हल्ला करत आहेत. आपला देश हे कधीही सहन करणार नाही. आम्ही एकत्र आहोत. अशा परिस्थितीत देश महत्त्वाचा होता. परंतु मोदी महत्त्वाचे बनले. देशासाठी लढण्याचा ठेका फक्त भाजपनेच घेतलेला नाही. आम्हीही देशासाठी त्याग केला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे. अशा पक्षाला तुम्ही कोणत्याही कारणास्तव दोष देऊ शकत नाही, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.