सर्वांच्या पाठबळामुळेच सत्तेची सहा वर्ष!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : मुख्यमंत्रीपदाची आज सहा वर्षे पूर्ण
पणजी : गोव्यातील पर्यटनाला अजून मोठी संधी प्राप्त करून देणे आणि गोव्यातील जास्तीत जास्त युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून देणे ही आता आपली दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. आतापर्यंत अनेक मोठे प्रकल्प हाती घेऊन विकासाची गंगा गोव्यात आणणे शक्मय झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा इत्यादींचे आशीर्वाद आणि गोमंतकीय जनतेचे पाठबळ यामुळेच आपण सत्तेची सहा वर्षे पूर्ण करू शकलो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यास डॉ. प्रमोद सावंत हे आज सत्तेची सहा वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्त दैनिक तऊण भारतशी त्यांनी आपले मत व्यक्त करून मन मोकळे केले. गेल्या 35 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड डॉ. प्रमोद सावंत यांनी मोडला. दिगंबर कामत वगळता गेल्या 35 वर्षांत एकही मुख्यमंत्री सत्तेची पाच वर्षे पूर्ण करू शकला नाही, मात्र डॉ. प्रमोद सावंत यांनी 2019 पासून 2022 पर्यंत व त्यानंतर आता 2025 पर्यंत अशी एकूण सत्तेची व मुख्यमंत्रीपदाची सलग सहा वर्षे पूर्ण केली आहेत.
गोव्यातील जनतेने आपल्याला नेहमीच पाठिंबा दिला. आपल्याला थोडा संघर्ष करावा लागला परंतु संघर्ष कोणालाही चुकलेला नसतो आणि त्यातून बरेच काही शिकता येते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही प्रकल्प हाती घेतले होते ते देखील आपल्याला पूर्ण करता आले. झुवारी पूल, मडगाव बायपास गोव्यातील बहुतेक राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम, आणि सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे मोपा विमानतळ प्रकल्प तो देखील पूर्ण करून कार्यान्वित करणे शक्मय झाले. ही सारी किमया केंद्रातील भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मदतीमुळे शक्मय झाली आहे.
आपल्याला जे पद मिळाले ते जनकल्याणासाठी आहे आणि त्यामुळेच आपण होईल तेवढे कष्ट घेतो. या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे स्वप्न उराशी बाळगूनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. केंद्रातील भाजप नेत्यांनी दिलेला पाठिंबा, त्यांचे वारंवार होणारे मार्गदर्शन, गोव्यातील सर्व आमदारांचा मिळत असलेला पाठिंबा, मंत्र्यांचे सहकार्य, आणि जनतेकडून मिळालेला आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती आहे आणि त्यातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. आपण नवीन नवीन योजना आखून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून करीत राहतो, हीच खरी गेल्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची यशोगाथा आहे, असे भावोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.