डोपिंग प्रकरणी सहा खेळाडू-प्रशिक्षक निलंबित
संजना,हिमांशू, शीना, बसंती कुमारी, शंकर यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रांची येथे नुकत्याच झालेल्या सिनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी अठरा वर्षीय संजना सिंग आणि तिचे प्रशिक्षक संदीप मान यांना डोपिंगच्या गुह्यांसाठी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. ही एक दुर्मिळ घटना आहे, ज्यामध्ये खेळाडू आणि मार्गदर्शक दोघांवरही दंड आकारण्यात आला आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या स्पर्धेत महिलांच्या 1500 आणि 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संजनाची मेथांडिएनोन आणि ऑक्सॅन्ड्रोलोन या दोन स्टिरॉइड्ससाठी पॉझिटिव्ह चाचणी आली. राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) च्या वेबसाइटनुसार, तिला डोपिंगच्या गुह्यासाठी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या बरोबर अॅथलेटिक्स प्रशिक्षक संदीप यांचाही उल्लेख केला आहे. निषिद्ध पदार्थांची तस्करी व खेळाडूला निर्बंधित पदार्थ घेण्यास पाठिंबा दिल्याने संदीप यांचे निलंबन करण्यात आले आहे. मध्यम पल्ल्याची धावपटू हिमांशू राठीलाही उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. ट्रिपल उडीतील शीना वर्की यांनी केस रिझोल्यूशन करार अंतर्गत लिगँड्रोल (एसऐआरम) उल्लंघनासाठी तीन वर्षांचे निलंबन स्वीकारले आहे. 33 वर्षीय केरळच्या या खेळाडूने यावर्षी उत्तराखंड राष्ट्रीय खेळांमध्ये रौप्यपदक जिंकले होते. 2025 च्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेली मध्यम अंतर धावणारी आणखी एक धावपटू, बसंती कुमारीही उत्तेजक चाचणीत आढळली. अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा वेटलिफ्टर शंकर लोगेश्वरनही चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले.