धर्मांतर प्रकरणी सहाजण ताब्यात
शिरसी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगळमने येथील घटना
कारवार : आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रयत्नशील असलेल्या सहा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शिरसी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगळमने येथे घडली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांची नावे परमेश्वर नाईक, सुनीता नाईक, धनंजय शिवण्णा, शालीनी राणी (सर्वजण रा. जिल्हा हावेरी), कुमार लमाणी आणि तारा लमाणी (रा. दोघेही जिल्हा कारवार) अशी आहेत. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, शिरसी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगळमने येथील रहिवासी आदर्श नाईक यांच्या घरी सहा व्यक्तींनी भेट दिली. नाईक यांच्या घरच्या नाजुक आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीचा लाभ उठवीत घरी भेट दिलेल्या व्यक्तींनी तुम्ही ठराविक धर्मात प्रवेश केला तर देव तुम्हाला सर्व काही देईल, देव तुमची आर्थिक आणि आरोग्य संकटे दूर करील, आम्ही पण सर्वांनी ठराविक धर्मात प्रवेश केला आहे. तुम्ही पण धर्मांतर करा, अशी आमिषे दाखविली. यावेळी आदर्श नाईक यांनी त्या व्यक्तीच्या हेतूबद्दल संशय आल्याने आणि आपल्या कुटुंबीयांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय बळावल्याने सदर घटनेची माहिती शिरसी ग्रामीण पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवली आहे.