देशात सहा जणांना नव्या विषाणूची बाधा
कर्नाटक, तामिळनाडूत प्रत्येकी दोन रुग्ण : गुजरात, बंगालमध्येही ‘एचएमपीव्ही’चा संसर्ग
वृत्तसंस्था/ अहमदाबाद, बेंगळूर
भारतातही एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने सावधानता बाळगण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. विशेषत: लहान मुलांना या विषाणूची लागण होत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कर्नाटकात बेंगळूरमध्ये दोघांना नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. आठ आणि तीन महिन्यांच्या मुलांना बाधा झाली आहे. तसेच गुजरातमधील अहमदाबादमध्येही पहिला रुग्ण आढळून आला आहे. येथे दोन महिन्यांच्या बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याव्यतिरिक्त तामिळनाडूत 2 आणि पश्चिम बंगालमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळाला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रोटोकॉलनुसार एचएमपीव्ही विषाणूवरील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एचएमपीव्ही विषाणूबाबत केंद्र आणि राज्य सरकार सतर्क आहेत. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. गरज पडल्यास काय करावे आणि काय करू नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील, असेही सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये बाधा झालेल्या मुलाला अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी लॅबमध्ये मुलांचा एचएमपीव्ही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे बालक मूळच मोडासाजवळील गावातील आहे. आता मुलाची प्रकृती स्थिर आहे. मुलामध्ये सर्दी आणि तापाची लक्षणे दिसताच त्याला अहमदाबादला नेण्यात आले.