सहा महिने काम, एक कोटी वेतन
हे जग साहसी लोकांसाठी आहे. जे चाकोरीच्या बाहेर विचार करतात आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी धोका पत्करायलाही सज्ज असतात, त्यांच्यासाठी या जगात अनेक स्थाने अशी आहेत. की जिथे हे लोक त्यांचे समाधान शोधू शकतील. अशाच साहसी लोकांसाठी सध्या एक नोकरी चालून आली आहे. या नोकरीत काम केवळ सहा महिनेच करायचे आहे. मात्र, वेतन चक्क एक कोटी रुपये मिळणार आहे. या नोकरीची ऑफर सध्या एका पर्यावरण कार्यकर्त्याला आलेली आहे. तथापि, त्याने ती पटकन् स्वीकारलेली नाही. ही नोकरी आपण स्वीकारावी की नाही, यासंबंधी त्याने इंटरनेटवर लोकांच्या सूचना मागविल्या आाहेत. ही नोकरी त्याला जगातील सर्वात थंड आणि निर्मनुष्य असणाऱ्या अंटार्कटिका खंडावर मिळाली आहे. या हिममय खंडावर एक स्थानक स्थापन करण्यात आले आहे. तिथे त्याला एकट्याने वास्तव्य करुन या स्थानकाची देखभाल करावी लागणार आहे. हे काम केवळ सहा महिन्यांसाठीच आहे.
त्यासाठी याला 1 लाख 45 हजार डॉलर्स किंवा साधारणत: 1 कोटी 31 रुपये वेतन दिले जाणार आहे. इतके वेतन असूनही त्याला ही नोकरी स्वीकारताना विचार करावा लागत आहे. कारण सहा महिन्यांचा हा पूर्ण एकांतवास, जिथे त्याला पांढऱ्या शुभ्र हिमाशिवाय काहीही दिसणार नाही, त्याला स्वीकारावा लागणार आहे. म्हणूनच त्याने सोशल मिडियावर ही माहिती देऊन नोकरी स्वीकारावी की नाही, यासंबंधी लोकांकडून मते मागविली आहेत. सध्या त्याचा व्हिडीओ प्रसारित होत आहे. अनेकांनी तो पाहिला असून त्यावर साधक-बाधक मतप्रदर्शन केले आहे. अंटार्कटिकासारख्या प्रदेशातील ही नोकरी हे त्याच्यासाठीच नव्हे, तर अन्य कोणत्याही धाडसी माणसासाठीही आव्हानात्मकच असेल. समजा, त्याने ही नोकरी नाकारली, तर अन्य साहसींसाठी एक मोठी संधी निश्चितच उपलब्ध होणार आहे.