सहा ई-शिवाई बस जिह्यात दाखल
सातारा डेपोला चार आणि महाबळेश्वर डेपोला दोन
1 डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत
तिकीट दर जास्त तशा सोयी सुविधाही
सातारा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन ई बसेस दाखल झाल्या आहेत. यापैकी सहा ई बस सातारा जिह्यात दाखल झाल्या असून 1 डिसेंबर पासून सातारा व महाबळेश्वर डेपो तून त्या महाबळेश्वर-स्वारगेट मार्गासह सोलापूर व निगडी मार्गावर धावत आहेत. यांचा तिकीट दर जास्त असला तरी प्रवाश्यांना चांगल्या सोयी-सुविधाही देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या सुचनेप्रमाणे सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेत अधिकाधिक विद्युत वाहनांचा समावेश करण्याचे सर्वत्र राज्य सरकारचे धोरण आहे. 12 मीटर लांबीच्या नव्या वातानुकूलित ई- बससेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ई- शिवाईच्या नावाने विविध मार्गावर टप्प्याटप्प्याने त्या धावत आहेत. सुमारे 45 प्रवासी या बसमधून प्रवास करत आहेत.
ई- शिवाई बसमधून प्रवाशांचा प्रदुषणमुक्त प्रवास होण्याबरोबर इंधनावरील खर्च कमी होणार आहे. एसटी महामंडळाची विजेवर धावणारी वातानुकुलीत बस म्हणून तिचा नावलौकिक आहे. या बसचा रस्त्यावर धावाताना आवाजही येतं नाही. बसमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प, बस जीपीएसयुक्त आहे. आपत्कालीन सूचना देण्यासाठी बटणाची सुविधा, आरामदायी सीट, सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अन्य सुविधा आहेत. प्रायोगिक तत्वावर महाबळेश्वर-स्वारगेट, सातारा- निगडी (पुणे), सातारा- सोलापूर मार्गावर धावणाऱ्या ई बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सातारकरांचा प्रवास होणार जलद...
संपूर्णत: इलेक्ट्रिक असलेल्या या बसेसची अंतर्गत सजावट उत्कृष्ट असल्याने अल्पावधीत त्या बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. फूल चार्जिंगनंतर 300 किलोमीटर अंतर पार करते. बस पूर्ण वातानुकुलीत असून बसमध्ये प्रवाशांना मोबाईल चार्जिंगची सुविधा निर्माण करून दिली आहे. बसचे स्वयंचलित दरवाजे असून रेल्वेप्रमाणे पुस्तके वाचण्यासाठी आसनाच्या वरील बाजूस लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.