For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसआयटीचा रोख...हिमनगाचे टोक!

06:30 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसआयटीचा रोख   हिमनगाचे टोक
Advertisement

पेनड्राईव्हच्या माध्यमातून महिलांचे व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केले त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळेच एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांबरोबरच त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली होती.

Advertisement

कर्नाटकातील सर्व 28 जागांसाठी निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे. पहिल्या टप्प्यात 69.29 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील 14 लोकसभा मतदारसंघांसाठी 69.50 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 तर चिकोडीत 78.51 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार? याचे आडाखे बांधण्याचे काम राजकीय जाणकार करू लागले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहेत. आता निकालाची प्रतीक्षा आहे. कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येणार? यावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पैजा लागल्या आहेत. ऐन निवडणुकीत उघडकीस आलेल्या प्रज्ज्वल रेवण्णा पेनड्राईव्ह प्रकरणामुळे भाजप-निजद युतीची चांगलीच पंचाईत झाली होती. आता भाजपने निजदबरोबर  सोयीस्कर अंतर राखण्याचे ठरविले आहे. या प्रकरणामुळे युती तुटणार की काय? अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

निवडणुका म्हटल्या, की पायाभूत सुविधा, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, रस्ते, गटार आदींविषयी ठळक चर्चा होतेच. कर्नाटकात विकासाचा मुद्दा बाजूलाच पडला. केवळ पेनड्राईव्ह प्रकरणावरून सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यात मतदान होण्याआधीच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पेनड्राईव्ह प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते स्वत: निजदचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपले बंधू एच. डी. रेवण्णा यांना झालेल्या अटकेमुळे कुमारस्वामी यांचा पारा चढला आहे. साहजिकच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या प्रकृतीवरही या प्रकरणाने परिणाम झाला आहे. नव्वदी पार केलेल्या देवेगौडांना उतारवयात आपल्या नातवामुळे शरमेने मान खाली घालावी लागली. प्रसारमाध्यमात तर प्रज्ज्वलपेक्षाही देवेगौडांचा नातू, कुमारस्वामी यांचा पुतण्या कसा बलात्कारी आहे, हे ठासून सांगितले जात आहे. यामुळेच कुमारस्वामी व देवेगौडा या नावांशी प्रज्ज्वल प्रकरण जोडू नये, यासाठी न्यायालयातून मनाई आदेश मिळविण्यात आला आहे. कारण हासनचा विद्यमान खासदार प्रज्ज्वलपेक्षाही या प्रकरणात देवेगौडा व कुमारस्वामी यांनाच काँग्रेसने निशाणा बनविले आहे.

Advertisement

एच. डी. रेवण्णा यांना अपहरण प्रकरणात अटक झाली आहे. पाच दिवस पोलीस कोठडीत घेऊन एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केली. आपण कोणाचे अपहरण केले नाही. या प्रकरणाशी आपला काही एक संबंध नाही, अशी जबानी रेवण्णा यांनी एसआयटीच्या अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना परप्पन अग्रहार कारागृहात पाठवण्यात आले आहे. त्यांना जामीन मिळविण्यासाठी नामवंत वकिलांची फौजच उभी करण्यात आली आहे. पेनड्राईव्ह प्रकरणामुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. प्रज्ज्वलने अनेक महिलांशी केलेले चाळे स्वत:च आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले आहेत. त्याचे व्हिडिओ असलेले पेनड्राईव्ह मोठ्या प्रमाणात वाटण्यात आले आहेत. व्हिडीओ वाटताना त्या महिलांचे काय होईल? याचा विचार कोणीच केल्याचे दिसत नाही. पेनड्राईव्हमधील अश्लील व्हिडिओमध्ये प्रज्ज्वलचा चेहरा फार कमी ठिकाणी दिसतो. त्याच्या वासनेची शिकार बनलेल्या महिलांची छबी मात्र स्पष्टपणे दिसते. अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर अनेक घरात भांडणे सुरू झाली आहेत. त्यामुळे अनेक महिलांचे भवितव्य अडचणीत आले आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर विदेशात पलायन केलेला प्रज्ज्वल रेवण्णा अद्याप परतला नाही. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी एसआयटीचे अधिकारी कामाला लागले आहेत. या प्रकरणामागे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात असल्याचा उघड आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. पेनड्राईव्हमधील असलेल्या व्हिडिओमधील बाराहून अधिक महिलांना डी. के. शिवकुमार यांनी कुमार कृपा गेस्टहाऊसमध्ये ठेवले आहे. त्यांना आमिष दाखवून एसआयटीसमोर जबानी देण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांबरोबरच त्याचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली होती. सध्या एसआयटीचा तपास एच. डी. रेवण्णा, प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या भोवतीच सुरू आहे. अॅड. देवराजेगौडा यांनीही उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेच पेनड्राईव्ह प्रकरणाचे सूत्रधार आहेत, असा आरोप केला आहे. एसआयटीने शिवकुमार यांनाही नोटीस पाठवून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सरकारी महिला अधिकाऱ्यांचेही लैंगिक शोषण झाले आहे. चित्रफितीतील महिलांचा शोध घेऊन त्यांची जबानी नोंदविण्याचे काम एसआयटीने हाती घेतले आहे. मात्र, पेनड्राईव्हच्या माध्यमातून महिलांचे व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केले, त्या कार्तिकलाही अद्याप अटक झाली नाही. त्यामुळेच एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

या प्रकरणाच्या मुळापर्यंतच जायचे असेल तर अॅड. देवराजेगौडा, कार्तिक, डी. के. शिवकुमार यांचीही चौकशी झालीच पाहिजे. सध्या एसआयटीची भूमिका व कार्यपद्धत लक्षात घेता केवळ एच. डी. रेवण्णा व प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याभोवतीच त्यांचा तपास सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी भाजप व निजद नेते करू लागले आहेत. पेनड्राईव्ह वाटप होण्याआधी डी. के. शिवकुमार, एल. आर. शिवरामेगौडा व अॅड. देवराजेगौडा यांचे झालेले संभाषण व्हायरल झाले आहे. त्यामुळे देवेगौडा कुटुंबीयांचे अस्तित्व संपविण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी या प्रकरणात आपली शक्ती वापरल्याचा आरोप केला जात आहे. ऑडिओ संभाषण लक्षात घेता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना हा विषय आधीपासूनच माहीत होता. हे प्रकरण हाताळण्यात सुरुवातीपासूनच त्यांचेही मार्गदर्शन लाभले आहे, हे दिसून येते. हे प्रकरण आता केवळ कर्नाटकापुरते मर्यादित राहिले नाही.

देशाच्या राजकीय पटलावर या प्रकरणाचा उल्लेख होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रज्ज्वल प्रकरणावरून निशाणा साधला जात आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रज्ज्वलला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही, असे ठासून सांगितले असले तरी तुम्ही ज्यांच्याशी युती केली आहे, ज्यांना निवडून आणण्यासाठी स्वत: पंतप्रधानांनी जाहीर सभा घेतली, ते प्रज्ज्वल रेवण्णा काय आहेत? हे भाजप नेत्यांना आधी कळले नाही का? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस नेते भाजपची कळ काढत आहेत. लवकरच विधान परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजप-निजदची युती टिकून राहणार का? की प्रज्ज्वल प्रकरणावरून युती तुटणार? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.