For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्थितप्रज्ञ किंवा स्थिरबुद्धी

06:32 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्थितप्रज्ञ किंवा स्थिरबुद्धी
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, राजा सकाम कर्म करण्याची सवय मोडण्यासाठी कर्मे करताना ती मला अर्पण करायची सवय लावून घे. त्यासाठी कर्माच्या सुरवातीला, करत असताना अधूनमधून व कर्माच्या शेवटी माझं स्मरण कर. असं सातत्याने करत गेलास की, तुझं मन तुझ्या नकळत ही गोष्ट करू लागेल आणि त्यातून तुला मिळणारा आनंद अवर्णनीय असेल. सकाम कर्माचे तात्पुरते महत्त्व लक्षात आल्यावर तुझे मन सकाम कर्मे करण्यापासून दूर होऊन निष्काम कर्मातून मिळणाऱ्या आनंदाचा ठेवा मिळवण्यासाठी आतुर होईल. आपल्याला ईश्वराने दिलेले काम केले की आपण निर्धास्त झालो असे वाटून वेदांनी सांगितलेले कर्म नि:शंक मनाने केल्याने परमात्म्याचे ठिकाणी बुद्धी स्थिर होऊन कर्मयोग साधला जातो. समाधानी माणसाला इच्छा होत नसल्याने त्याच्या मनाला आवर बसून शांत झालेलं मन इंद्रियांवर काबू मिळवतं. वैराग्य आल्यामुळे निरिच्छ मनात संकल्प विकल्प उठत नसल्याने बुद्धी स्थिर होऊन ईश्वरचरणी लीन होते. त्यामुळे मनुष्याला कर्मयोगाची म्हणजे निरपेक्ष कर्मे करण्याची हातोटी प्राप्त होते. अशा मनुष्याला बाप्पा स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धीचा म्हणून गौरवतात. ते म्हणतात,

मानसानखिलान्कामान्यदा धीमांस्त्यजेत्प्रिय ।

Advertisement

स्वात्मनि स्वेन सन्तुष्ट स्थिरबुद्धिस्तदोच्यते ।। 53।।

अर्थ- हे प्रिया, जेंव्हा बुद्धिमान् मनुष्य सर्व इच्छा सोडतो व स्वत:चे ठिकाणी संतुष्ट होतो तेंव्हा त्याला स्थितप्रज्ञ(अथवा स्थिरबुद्धि) म्हणतात.

विवरण- बाप्पा म्हणाले, सर्व इच्छा, वासनांचा त्याग केला की, मन स्थिर होतं आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करण्यासाठी बुद्धीने दिलेल्या प्रेरणेनुसार इंद्रियांना आज्ञा देतं. तसेच प्रारब्धभोगानुसार मिळणाऱ्या सुखदु:खात ते संतुष्ट राहतं. म्हणजेच संतुष्ट कसं रहायचं हे आपल्या विचासरणीवर अवलंबून आहे. आपले मूळ आत्मस्वरूप असून आपण ईश्वराचे अंश आहोत आणि तेच आपलं स्वसरूप आहे असा विचार मनात बाळगणं आपल्या भल्याचं आहे पण त्याऐवजी आपल्या इच्छा आकांक्षा त्यानुसार होणाऱ्या वासना आपण आपल्या समजत असतो. वास्तविक पाहता आपला जीवनक्रम ठरलेला आहे आणि त्यात काडीचाही बदल करायचा अधिकार आपल्याला नाही पण हे लक्षात न घेता, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून, आपल्या जीवनक्रमात आपली लुडबुड सुरू असते आणि त्या लुडबुडीच्या अपेक्षित परिणामांना धरून आपल्या मनात संकल्पविकल्प येत असतात. काहीवेळा बुद्धीचे आदेश डावलले जातात पण जेव्हा मनावरची इच्छा आकांक्षेची टरफले दूर होतात आणि मन बुद्धीचे मोठेपण मान्य करून बुद्धीचे आदेश पाळू लागते आणि स्वत: संकल्प करायचे बंद करते तेव्हा ते स्वस्थ होते. अशा प्रसन्न मन:स्थितीत मनुष्य मनाने स्थिर असतो. बाप्पा त्याला स्थिरप्रज्ञ म्हणतात. भगवतगीतेत त्यालाच स्थितप्रज्ञ असे म्हंटले आहे. वास्तविक पाहता आपला कर्ताकरविता ईश्वरच आहे पण अज्ञानामुळे आपण स्वत:ला कर्ते करविते समजत असतो पण स्थिरप्रज्ञ मनुष्याने ओळ्खलेलं असतं की, कर्तेकरविता ईश्वर असून तो करत असलेलं कार्य हे ईश्वरी कार्य आहे. साहजिकच तो मनुष्य ईश्वराचं सगुण रूप बनतो आणि त्या माध्यमातून त्याच्याकडून अलौकिक कार्य होते.

अशा स्थिरबुद्धि मनुष्याची व्यवहारात वर्तणूक कशी असते ते आपण पुढील श्लोकात पाहणार आहोत. तो श्लोक असा आहे.

वितृष्ण सर्वसौख्येषु नोद्विग्नो दु:खसङ्गमे ।

गतसाध्वसरुड्राग स्थिरबुद्धिस्तदोच्यते ।। 54 ।।

अर्थ- सर्व सुखांचे ठिकाणी इच्छाहीन, दु:खप्राप्तीचे ठिकाण उद्वेगहीन, ज्याची भीति-क्रोध व काम निघून गेली आहेत त्याला स्थिरबुद्धि म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.