धर्मस्थळ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी
राज्य सरकारकडून विशेष पथक स्थापन : राज्य पोलीस महासंचालकांकडे अहवाल सादर करण्याचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंगळूर जिल्ह्याच्या बेळतंगडी तालुक्मयातील धर्मस्थळ या प्रसिद्ध तीर्थस्थळात झालेल्या कथित अनैसर्गिक मृत्यूंच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. राज्याच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे पोलीस महासंचालक डॉ. प्रणव मोहंती हे या पथकाचे नेतृत्व करतील. तर नेमणूक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक एम. एन. अनुचेत, सीएआर सेंटरचे पोलीस उपायुक्त सौम्यलता आणि अंतर्गत सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार दयामा यांचा या पथकात समावेश आहे.
धर्मस्थळ परिसरात शेकडो मृतदेह पुरल्याचे एका व्यक्तीने अलीकडेच न्यायालयासमोर निवेदन दिले होते. दरम्यान, त्या भागात कवटी सापडल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. एका वैद्यकीय विद्यार्थिनीच्या कुटुंबाने तिच्या बेपत्ता होण्याबाबत माहिती दिली होती. यानंतर धर्मस्थळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 211अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राज्याच्या विविध भागातून एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच महिला आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून एसआयटी स्थापन करण्याची विनंती केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या पत्रात नमूद केलेल्या घटकांसह धर्मस्थळ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याची व्यापक चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. या संदर्भात पोलस महासंचालकांनी (डीजी आयजीपी) राज्यातील इतर पोलीस स्थानकांमध्ये नोंदवलेल्या किंवा भविष्यात नोंदवल्या जाणाऱ्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपास एसआयटीकडे सोपवावा. विशेष तपास पथकासाठी आवश्यक असलेले उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. याचबरोबर मंगळूर पोलीस कार्यालयात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर तपास पथकाने करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
तपास पथकाने वेळोवेळी राज्याच्या पोलीस महासंचालकांना तपासाच्या प्रगतीचा अहवाल द्यावा. धर्मस्थळात दाखल झालेल्या प्रकरणाची आणि राज्यातील उर्वरित पोलीस स्थानकांमध्ये नोंदवलेल्या सर्व प्रकरणांची व्यापक चौकशी करावी आणि महासंचालक, आयजीपींना अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
एसआयटीकडून केवळ धर्मस्थळ प्रकरणाची चौकशी
विशेष तपास पथक केवळ धर्मस्थळात मृतदेह दफन करण्याच्या प्रकरणाची चौकशी करेल. सौजन्य प्रकरणाचा कोणताही तपास होणार नाही. एसआयटी आपले काम सुरू करेल. दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे दबावाखाली करण्याचे काम नाही. तेथील भौतिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. या प्रकरणात लपविण्यासारखे काहीही नाही.
-डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री