प्रज्ज्वल रेवण्णांची एसआयटी अधिकाऱ्यांना हुलकावणी
परतीच्या प्रवासाचे विमानतिकीट रद्द : जर्मनीमध्येच मांडले ठाण
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासनमधील लैंगिक शोषण प्रकरणातील प्रमुख आरोपी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा अद्याप भारतात परतले नाहीत. बुधवारी जर्मनीतील म्युनिचहून भारतात निघालेल्या विमानात प्रज्ज्वल नसल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. त्यामुळे मागील 17 दिवसांपासून ते पोलिसांना हुलकावणी देत आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्यासंबंधी व्हिडिओ असणारे पेन ड्राईव्ह उघड झाल्यानंतर खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी 27 एप्रिल रोजी विदेश प्रवास हाती घेतला. एसआयटीने गुन्हा दाखल करून नोटीस बजावल्यानंतर त्यांनी सहा दिवसांची मुदत मागितली. ही मुदत संपल्यानंतरही ते हजर झाले नाहीत. माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांची जामिनावर मुक्तता झाल्याने ते न्यायालयात शरणागती पत्करतील, अशी चर्चा होती. परंतु, 15 मे रोजीचे परतीच्या प्रवासाचे तिकीट त्यांनी रद्द केल्याचे समजते. जर्मनीच्या म्युनिचहून बेंगळूरला परतण्यासाठी प्रज्ज्वल यांनी 15 तारखेचे बिझनेस क्लासचे विमानतिकीट बुकींग केले होते. ते बुधवारी दुपारी 12:05 वाजता जर्मनीहून निघालेल्या लुफ्तान्सा विमानात असतील. विमान बेंगळूरला आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याची तयारी एसआयटीने केली होती. त्यासाठी अधिकारी सकाळपासूनच विमानतळावर होते. परंतु, त्या विमानातील प्रवाशांची यादी विमानतळ अधिकाऱ्यांनी एसआयटीच्या पथकाला दिली. त्या यादीत प्रज्ज्वल यांचे नाव नसल्याचे एसआयटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
पेन ड्राईव्ह प्रकरणात काँग्रेसचा हात : आर. अशोक
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणात काँग्रेसचा हात आहे. मात्र, याचा ठपका काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाजपवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विधानसभचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना तत्काळ अटक करण्यात आली असली तरी कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही. एसआयटीचे अधिकारी पक्षपाती वृत्तीने काम करत आहेत. एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामागे एक व्हेलमासा आहे. त्याला मारून खायचे की नाही, हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंब ठरवेल, असे ते म्हणाले.
साहित्यिक, महिला संघटनांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाबाबत साहित्यिक, लेखक आणि महिला संघटनांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले आहे. प्रज्ज्वल रेवण्णा कोठेही असले तरी त्यांना शोधून अटक करावा, पीडित महिलांचे समुपदेशन करावे, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आळा घालावा, निश्चित कालावधीत एसआयटीचा तपास पूर्ण करावा, माजी कारचालक कार्तिकला अटक करावी, आपल्याजवळ व्हिडिओ आहेत, असे वक्तव्य करणाऱ्यांना कटाचा एक भाग म्हणून गुन्हा नोंदवावा, अशा अनेक मागण्या साहित्यिकांनी पत्राद्वारे केल्या आहेत. या पत्राला ‘जागृत नागरिकांचे खुले पत्र’ असे नाव देण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया, साहित्यिक डॉ. जी. रामकृष्ण, वसुंधरा भूपती, मीनाक्षी बाळी, के. नीला, के. एस. विमला, कुम वीरभद्रप्पा, मुझफ्फर अस्सादी यांच्यासह एकूण 107 जणांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे.