सिराज, उमरानला पहिले सामने हुकणार
वृत्तसंस्था/मुंबई
2024 च्या क्रिकेट हंगामातील खेळविण्यात येणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक प्रकृती नादुरुस्तीमुळे उपलब्ध होऊ शकणार नाहीत. दरम्यान संबंधित संघांनी या सामन्यासाठी दुसऱ्या बदली खेळाडूंची निवड केली.
त्याच प्रमाणे अष्टपैलु रविंद्र जडेजाला भारत ब संघातून मुबा देण्यात आली आहे. दुलीप करंडक स्पर्धेने 2024 च्या क्रिकेट हंगामाला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून आंध्रप्रदेश आणि बेंगळूर येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड असे चार संघ भाग घेत आहेत. भारत ब व क संघामध्ये अनुक्रमे नवदीप सैनी आणि गौरव यादव या बदली खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सिराजच्या जागी सैनीची तर उमरान मलिकच्या जागी गौरव यादवला संधी देण्यात आली आहे.
भारत अ संघाचे नेतृत्व शुभमन गील, भारत ब संघाचे नेतृत्व अभिमन्यु ईश्वरन्, भारत क संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड तर भारत ड संघाचे नेतृत्व श्रेयश अय्यर करीत आहेत. या स्पर्धेत नितीश कुमारच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली असून तंदुरुस्ती समस्येमुळे त्याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.