एसआयपीची मोठी झेप : 27 हजारहून अधिक गुंतवणूक
जूनमध्ये म्युच्युअल फंड उद्योगांची मोठी कामगिरी
मुंबई :
मागील काही दिवसांपासून आपण पहात असलेल्या विविध गुंतवणूक प्रकारांमध्ये एसआयपी (म्युच्युअल फंड) प्रकार हा लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जून 2025 या महिन्यात म्युच्युअल फंड्समध्ये एसआयपीच्या मदतीने जवळपास 27,269 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाल्याची माहिती आहे.
प्रथमच एसआयपीचा प्रवाह हा 27,000 कोटींपेक्षा मोठा आकडा प्राप्त झाल्याची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये झालेली एसआयपीमधील गुंतवणूक ही 2 टक्के अधिकची राहिली आहे. या मजबूत कामगिरीमुळे समाजातील लोक आता नियमित गुंतवणूक करण्याचे नियोजन आखत असल्याचे पहावयास मिळत आहे. संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगामध्ये जूनमध्ये 49,301 कोटी रुपयांचा मजबूत इनफ्लो प्राप्त झाला आहे. म्हणजे मे महिन्याच्या तुलनेत 67 टक्क्यांची वाढ राहिली आहे. एकट्या इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये 23,587 कोटी रुपये इतका पैसा आला आहे. जो मे च्या तुलनेत 24 टक्के अधिक राहिला आहे.
म्युच्युअल फंड उद्योगांची ऐतिहासिक चमक
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) यांच्या माहितीनुसार जून महिन्यात एकूण असेट्स मॅनेजमेंट वधारुन 74.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मे 2025 मध्ये 71.93 लाख कोटी होता. म्हणजे मागील महिन्यापेक्षा यात 3 टक्के वाढ राहिली आहे.
एसआयपीमध्ये असेही विक्रम :
? जूनमध्ये एकूण 61.91 लाख नवीन एसआयपींची नोंदणी
? जूनमध्ये एसआपीच्या आधारे गुंतवणाऱ्या खात्यांची संख्याही विक्रमी 8.64 कोटींवर राहिली आहे.
? एकूण फंड फोलियांची संख्या 24.13 कोटींवर
?म्युच्युअल फंड आता मुख्य प्रवाहातील गुंतवणूक मार्ग बनला