एसआयपी गुंतवणूक 29 हजार 529 कोटींवर
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक घटली
वृत्तसंस्था/ मुंबई
एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अंतर्गत गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून 29,500 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली आहे. या आधीच्या सप्टेंबर महिन्यात 29 हजार 361 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.
तर याच्या मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये 28,265 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. दुसरीकडे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मासिक स्तरावर गुंतवणूक घसरून 24,690 कोटी रुपयांवर आली आहे. जागतिक व्यापाराची चिंता बाजारावर दिसून येत आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे.
सक्रिय खातेदारांची संख्या 9.45 कोटी
याच दरम्यान एसआयपी सक्रिय खातेदारांची संख्या 9.45 कोटी इतकी झाली आहे. आधीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये एसआयपी खातेदारांची संख्या 9.25 कोटी इतकी होती. ऑगस्टमध्ये ही संख्या 8.99 कोटी होती. एकूण एसआयपी खातेदारांची संख्या वाढून 9.88 कोटींवर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये खातेदारांची संख्या 9.73 कोटी इतकी होती. 60 लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत.