सिंकफिल्ड कप : गुकेश, प्रज्ञानंदच्या वाट्याला बरोबरी
वृत्तसंस्था/सेंट लुईस, अमेरिका
सिंकफिल्ड कपच्या तिसऱ्या फेरीत विश्वविजेत्या डी. गुकेशला एकमेव वाइल्ड कार्डधारक असलेल्या अमेरिकेच्या सॅम्युअल सेव्हियनने बरोबरीत रोखले, तर भारतीय खेळाडू आर. प्रज्ञानंदनेही उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हसह गुण विभागून घेतले. दोन दिवसांत दुसऱ्या बरोबरीमुळे प्रज्ञानंद आघाडीवर असलेल्या तीन खेळाडूंच्या गटात राहिला आहे, ज्यामध्ये आता अमेरिकेचा फॅबियानो काऊआना आणि आर्मेनियन-अमेरिकन लेव्हॉन अॅरोनियन यांचा समावेश आहे. काऊआनाने दिवसाच्या एकमेव निर्णायक सामन्यात फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाला स्पर्धेत पहिला पराभव स्वीकारायला लावला. अॅरोनियनला फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हने बरोबरीत रोखले, तर अमेरिकेच्या वेस्ली सोने पोलंडच्या डुडा जान-क्रिस्टॉफसह गुण विभागून घेतले.
3,75,000 अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत अजून सहा फेऱ्या बाकी असताना प्रज्ञानंद, अॅरोनियन आणि काऊआना प्रत्येकी दोन गुणांसह आघाडीवर आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ वेस्ली, फिरोजा, वाचियर-लाग्रेव्ह, सेव्हियन आणि गुकेश हे सर्व जण अर्ध्या गुणाने मागे आहेत. डुडा एका गुणासह पुढच्या क्रमांकावर आहे, तर अब्दुसत्तोरोव्हने येथील त्याच्या पहिल्या तीन सामन्यांमधून अर्धा गुण मिळवला आहे. गुकेशसाठी काळ्या सोंगट्यांसह खेळताना स्पर्धेतील पहिली बरोबरी खूपच सोपी होती. सॅम्युअल सेव्हियनने सिसिलियन बचावाविऊद्ध रॉस्लिमो व्हेरिएशन वापरून पाहिले. परंतु गुकेशचे नेहमीच नियंत्रण राहिले. मधला टप्पाही सुरळीत पार पडून शेवटचा टप्पा हा अनिर्णीत अवस्थेकडे झुकला. प्रज्ञानंद दोन सामने पांढऱ्या सेंगट्या घेऊन खेळल्यानंतर काळ्या सोंगट्या घेऊन तो पहिला सामना खेळला. यावेळी त्याने निमझो-इंडियन बचाव निवडला, तर अब्दुसत्तोरोव्ह आपला फॉर्म शोधण्यात संघर्ष करत राहिला. अब्दुसत्तोरोव्हला फारशी काही अनुकूलता मिळू शकली नसली, तरी खेळ ज्या प्रकारे झाला ते पाहता बरोबरी हा एक योग्य निकाल होता. दुसरीकडे, काऊआना फिरोजाला हरवताना उत्तम पोझिशनल गेम खेळला. निमझोविऊद्धच्या फियानचेटो व्हेरिएशनमुळे काऊआनाला फायदा मिळाला.