इटालियन स्पर्धेत सिनरचे विजयी पुनरागमन
स्वायटेक, केनिन पराभूत, साबालेन्का विजयी
वृत्तसंस्था/ रोम
तीन महिन्यांच्या डोपिंग बंदीनंतर जेनिक सिनरने पुनरागमन करताना येथे सुरू झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत विजय मिळविला. त्याने मारियानो नॅव्होनचा पराभव केला.
अव्वल मानांकन मिळालेल्या सिनरने नॅव्होनवर 6-3, 6-4 अशी मात केली. जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर त्याचा हा पहिलाच सामना होता. त्याची पुढील लढत 93 व्या मानांकित नेदरलँड्सच्या पात्रता फेरीतून आलेल्या जेस्पर डी जो याच्याशी होईल. जेस्पर जोने 25 व्या मानांकित अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिनाला 6-0, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. यापूर्वी 1976 मध्ये इटलीच्या खेळाडूने ही स्पर्धा जिंकली होती. अॅड्रियानो पॅनाटाने त्यावेळी जेतेपद मिळविले होते.
महिला एकेरीत तीन वेळच्या विजेत्या इगा स्वायटेकला डॅनियली कॉलिन्सने 6-1, 7-5 असा पराभवाचा धक्का देत तिचे आव्हान संपुष्टात आणले. गेल्या आठवड्यात तिला माद्रिद ओपनमध्ये कोको गॉफने उपांत्य फेरीत हरविले होते. अन्य एका सामन्यात अग्रमानांकित एरीना साबालेन्काने अमेरिकेच्या 31 व्या मानांकित सोफिया केनिनचा 3-6, 6-3, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. तिची पुढील लढत युव्रेनच्या मार्टा कोस्ट्युकशी होईल.