सिनर-पॉल उपांत्य, गॉफ-पाओलिनी अंतिम फेरीत जेनिस सिनर
वृत्तसंस्था/ रोम
जेनिक सिनरने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले असून त्याने नॉर्वेच्या कास्पर रुडचा एकतर्फी धुव्वा उडविला. महिलांमध्ये कोको गॉफने तीन सेट्सच्या मॅरेथॉन लढतीत चीनच्या किनवेन झेंगचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
सिनरने कास्पर रुडचा 6-0, 6-1 असा फडशा पाडत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. रुड हा सिनरचा मोठा अडथळा ठरणार अशी अटकळ होती. तो क्लेकोर्टवर चांगले प्रदर्शन करीत या स्पर्धेत उतरला होता. याच महिन्यात झालेली माद्रिद ओपन स्पर्धा त्याने जिंकली होती. पण 23 वर्षीय सिनरने सहाव्या मानांकित रुडला एकतर्फी हरविले. पहिला सेट तर त्याने केवळ 27 मिनिटांत घेतला. अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात टॉमी पॉलने ह्युबर्ट हुरकाझचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये प्रवेश मिळविला. दोन तास ही लढत रंगली होती. इटालियन ओपन स्पर्धेची सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठणारा अमेरिकेचा तो पीट सांप्रासनंतरचा दुसरा खेळाडू आहे. सांप्रासने 1993-94 मध्ये असा पराक्रम केला होता. अल्कारेझ व लॉरेन्झो मुसेटी यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल.
महिला एकेरीत कोको गॉफने सिनरच्या सामन्यानंतर जवळपास रिकामे झालेल्या कोर्टवर शानदार खेळ करीत झेंगवर 7-6 (7-3), 4-6, 7-6 (7-4) अशी मात केली. ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या झेंगवर तिने मिळविलेला हा सलग तिसरा विजय आहे. झेंग या मोसमातील पहिले जेतेपद मिळविण्याचा प्रयत्न करीत होती. माद्रि्रद ओपनमध्ये तिने अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम लढतीत तिला साबालेन्काने हरवित जेतेपद पटकावले होते. गॉफने या वर्षी दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. सहाव्या मानांकित जस्मिन पाओलिनीने अंतिम फेरी गाठताना पेटन स्टीयर्न्सचा 7-5, 6-1 असा पराभव केला. पाओलिनीला दुहेरी मुकुट मिळविण्याची संधी आहे. महिला दुहेरीतही तिने सारा इराणीसमवेत अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मायरा अँड्रीव्हा व डायना श्नायडरविरुद्ध त्यांची उपांत्य लढत होत आहे.