For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिनर, गॉफ, केनिन, बेडोसाची विजयी

06:59 AM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिनर  गॉफ  केनिन  बेडोसाची विजयी
Advertisement

व्हेरेव्ह, डी मिनॉर, अँड्रीव्हा, अझारेन्का दुसऱ्या फेरीत, ओसाका, मेदवेदेव्ह, डिमिट्रोव्ह, फ्रिट्झ पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

जपानच्या नाओमी ओसाकाला फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेवेळी तिला अश्रू अनावर झाले. पॉला बेडोसाने तिचे आव्हान संपुष्टात आणले. जेनिक सिनरने दुसरी फेरी गाठली तर अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झ व एमा नेव्हारो यांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. याशिवाय डॅनील मेदवेदेव्ह व डिमिट्रोव्ह, टेलर फ्रिट्झ, नेव्हारो यांचे आव्हानही संपुष्टात आले. कोका गॉफ, सोफिया केनिन, अँड्रीव्हा, अझारेन्का, अलेक्झांडर व्हेरेव्ह, अॅलेक्स डी मिनॉर यांनी दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

10 व्या मानांकित पॉला बेडोसाने ओसाकाचे आव्हान 6-7 (1-7), 6-1, 6-4 असे संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली. ओसाकाच्या नावावर हार्ड कोर्टची चार ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे असून तिने यूएस ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र प्रेंच ओपन रेड क्ले कोर्टवर तिला तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाहे. माजी अग्रमानांकित असणारी ओसाका सध्या जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर आहे. 2021 मध्ये तिने येथील स्पर्धेतून दुसऱ्या फेरीच्या सामन्याआधी माघार घेतली होती. डिप्रेशनच्या कारणास्तव तिने नंतर अनेकदा ब्रेक घेतले होते.

पुरुष एकेरीत अग्रमानांकित इटलीच्या जेनिक सिनरने ग्रँडस्लॅममधील विजयी सामन्यांची संख्या 15 वर नेताना फ्रान्सच्या आर्थर रिन्डर्कनेचवर 6-4, 6-3, 7-5 अशी मात केली. सिनरवर तीन महिन्यांची डोपिंग बंदी घालण्यात आली होती. पुनरागमन केल्यानंतर त्याची ही दुसरी स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली होती. सिनरने आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्या सर्व हार्ड कोर्टवरील आहेत. रोलाँ गॅरोवर त्याने मागील वर्षी उपांत्य फेरी गाठली होती, हीच त्याची येथील सर्वोत्तम कामगिरी आहे. नंतर विजेत्या ठरलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने त्याला पाच सेट्सच्या झुंजीत त्याला हरविले होते. 75 व्या मानांकित रिन्डर्कनेचविरुद्धचा सिनरचा विजय हा टॉप 20 बाहेरील खेळाडूंवर मिळविलेला सलग 62 वा विजय आहे. रिचर्ड गॅस्केटविरुद्धची पुढील लढत होईल. 38 वर्षीय गॅस्केटने आपल्या कारकिर्दीतील ही शेवटची स्पर्धा असल्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेचे दोन वरचे मानांकन असलेल्या खेळाडूंचे आव्हानही पहिल्या फेरीत समाप्त झाले. पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झला 66 व्या मानांकित जर्मनीच्या डॅनियल अल्टमायरने 7-5, 3-6, 6-3, 6-1 असे हरविले. बिग सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रिट्झला डॅनियलला पाचवेळा भेदले आणि ग्रँडस्लॅममध्ये टॉप 50 वरील विजय मिळविण्याची मालिका खंडित झाली. मागील वर्षी यूएस ओपनमध्ये फ्रिट्झने उपविजेतेपद मिळविले होते.

महिला एकेरीत नवव्या मानांकित एम्मा नेव्हारोचा स्पेनच्या जेसिका बुझास मॅनेरोने 6-0, 6-1 असा केवळ 57 मिनिटांत एकतर्फी धुव्वा उडविला. बुझास मॅनेरोचा कारकिर्दीतील सर्वात मोठा विजयही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच साकार झाला आहे. तिने गेल्या वर्षी विद्यमान चॅम्पियन मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाचा विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव केला होता.

अन्य सामन्यात पुरुष एकेरीत अकराव्या मानांकित डॅनिल मेदवेदेव्हलाही पहिल्या फेरीत धक्का बसला. त्याला कॅमेरॉन नोरीने पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 7-5, 6-3, 4-6, 1-6, 7-5 असे हरविले. तिसऱ्या मानांकित अलेक्झांडरने व्हेरेव्हने दुसरी फेरी गाठताना एल. तिएनचा 6-3, 6-3. 6-4 असा पराभव केला तर 16 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हने ई. क्विनविरुद्ध तीन सेटनंतर माघार घेतल्याने क्विनला पुढे चाल मिळाली. डिमिट्रोव्हने पहिले दोन सेट 6-2, 6-3 असे जिंकले होते तर तिसरा सेट क्विनने 6-2 असा जिंकला होता. नवव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने लॅजोविच डेअरचा 6-3, 6-4, 7-6 (8-6) असा पराभव केला.

महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित कोको गॉफने गॅडेकीवर 6-2, 6-2, 31 व्या मानांकित सोफिया केनिनने व्हर्व्हारा ग्रॅशेव्हाचा 6-3, 6-1, व्हिक्टोरिका अझारेन्काने यानिना विकमेयरचा 6-0, 6-0 असा धुव्वा उडवला तर सहाव्या मानांकित मायरा अँड्रीव्हाने दुसरी फेरी गाठताना क्रिस्टिना बुक्साचा 6-4, 6-3 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.