सिनर, गॉफ, जोकोविच, मॅडिसन कीज तिसऱ्या फेरीत
व्हेरेव्ह, ड्रेपर, पेगुला, व्हान्ड्रूसोव्हा, अँड्रीव्हा यांची आगेकूच, मोनफिल्स, गॅस्केट पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
अमेरिकेच्या कोको गॉफ सर्व्हिसच्या अडचणीला सामोरे जावे लागले असले तरी तिने झेकच्या पात्रता फेरीतून आलेल्या तेरेझा व्हॅलेन्टोव्हावर विजय मिळवित प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. पुरुष एकेरीत जेनिक सिनरने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटचे आव्हान संपुष्टात आणत आगेकूच केली. अलेक्झांडर व्हेरेव्ह , जॅक ड्रेपर, मॅडिसन कीज, मायरा अँड्रीव्हा यांनी तिसरी फेरी गाठली तर गेल मोनफिल्सचे आव्हान समाप्त झाले.
प्रेंच ओपनचे पहिले जेतेपद मिळविण्याचा प्रयत्नात असणाऱ्या द्वितीय मानांकित गॉफने व्हॅलेन्टोव्हावर 6-2, 6-4 अशी मात करीत तिसरी फेरी गाठली. 18 वर्षीय व्हॅलेन्टोव्हाने गेल्या वर्षीत प्रेंच ओपन स्पर्धेत ज्युनियर गटात जेतेपद पटकावले होते. ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. गॉफला तिने दुसऱ्या सेटमध्ये पाचदा भेदले. शनिवारी गॉफची पुढील लढत झेकच्या मारी बुझकोव्हाशी होईल.
तिसरी फेरी गाठणाऱ्या अन्य महिला खेळाडूंत तिसरी मानांकित जेसिका पेगुला, मॅडिसन कीज, 18 वर्षीय मायरा अँड्रीव्हा, विम्बल्डन चॅम्पियन मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा यांचा समावेश आहे. 2019 मध्ये येथे अंतिम फेरी गाठलेल्या व्होन्ड्रूसोव्हाने 25 व्या मानांकित मॅग्डालेना फ्रेचवर 6-0, 4-6, 6-3 अशी मात केली.
गॅस्केटची पराभवाने कारकिर्दीची सांगता
पुरुष एकेरीत अग्रमानांकित जेनिक सिनरने 38 वर्षीय रिचर्ड गॅस्केटचा कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात 6-3, 6-0, 6-4 असा पराभव केला. आपली ही शेवटची स्पर्धा असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली तर त्याला ऑनररी ट्रॉफीही देण्यात आली. 2007 मध्ये त्याने कारकिर्दीत सर्वोच्च 7 वे मानांकन मिळविले होते. याशिवाय त्याने तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विम्बल्डनमध्ये दोनदा तर यूएस ओपनमध्ये एकदा. पण त्याला एकदाही अंतिम फेरी गाठता आर्लीं नाही. त्याने 16 एटीपी स्पर्धा जिंकल्या आणि 2017 मध्ये डेव्हिस चषक स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा तो सदस्य होता. 2002 मध्ये सुरू झालेल्या कारकिर्दीत त्याने 1000 हून अधिक सामने खेळले. फ्रेंच ओपनमध्ये खेळण्याची त्याची ही 22 वी वेळ होती.
तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह व 14 वा मानांकित ऑर्थर फिल्स यांनीही आगेकूच केली तर 24 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोव्हॅक जोकोविचला कोरेन्टिन मुटेटवर विजय मिळविताना मेडिकल टाईमआऊट घ्यावे लागले. जोकोविचने मुटेटवर 6-3, 6-2, 7-6 (7-1) असा विजय मिळविला. अन्य एका सामन्यात पाचव्या मानांकित जॅक ड्रेपरने फ्रान्सचा आणखी एक खेळाडू गोल मोनफिल्सचे आव्हान 6-3, 4-6, 6-3, 7-5 असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. ड्रेपरची पुढील लढत 18 वर्षीय जोआव फोन्सेकाशी होईल.