सिनर, जोकोविच, अँड्रीव्हा, उपांत्यपूर्व फेरीत
बेन्सिक, स्वायटेक, शेल्टन, कोबोली यांचीही आगेकूच, डिमिट्रोव्ह, डी मिनॉर, सिलिक, नेव्हारो स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
इटलीचा जेनिक सिनर, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, अमेरिकेचा बेन शेल्टन, मायरा अँड्रीव्हा, बेलिंडा बेन्सिक यांची विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. बल्गेरियाचा ग्रिगोर डिमिट्रोव्ह, एम्मा नेव्हारो, एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा, अॅलेक्स डी मिनॉर, मारिन सिलिक यांचे आव्हान संपुष्टात आले.
इटलीच्या अग्रमानांकित जेनिक सिनरने हाताच्या कोपराला दुखापत झाली असली तरी त्याला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. दोन सेटची आघाडी घेत तिसऱ्या सेटमध्ये 2-2 अशी बरोबरी झाली असताना बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने स्नायू दुखापतीमुळे माघार घेतल्याने सिनरला आगेकूच करण्याची संधी मिळाली. सिनरही आपल्या दुखापतीवर उपचार करून घेणार असून एमआरआय स्कॅन केल्यानंतर त्याचे निश्चित स्वरूप कळेल. सिनरने या सामन्याआधी एकही सेट गमविला नव्हता. पण 19 व्या मानांकित डिमिट्रेव्हने पहिले दोन सेट 6-3, 7-5 असे जिंकून सिनरवर आघाडी घेतली होती. पण नंतर त्याला दुखापतीमुळे सामना पूर्ण करता आला नाही. अन्यथा एक अपसेट निकाल पहावयास मिळाला असता. तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सिनरची पुढील लढत 10 व्या मानांकित बेन शेल्टनशी होईल. सिनरने त्याला मागील पाच लढतीत हरविलेले आहे.
जोकोविच, कोबोलीची आगेकूच
नोव्हॅक जोकोविचने 11 व्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरचा 1-6, 6-4, 6-4, 6-4 असा पराभव करीत आगेकूच केली. या सामन्यावेळी रॉजर फेडररही उपस्थित होता. याशिवाय भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होते. पहिला सेट गमविल्यानंतर दोन सेट्स जिंकत आघाडी घेतली आणि चौथ्या सेटमध्ये 1-4 असे पिछाडीवर पडल्यानंतर नियंत्रण मिळवित सलग पाच गेम्स जिंकून सामना संपवला. तो आठव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. 2023 मध्ये त्याने शेवटचे ग्रँडस्लॅम जेतेपद यूएस ओपनमध्ये मिळविले होते. त्याची पुढील लढत 22 व्या मानांकित इटलीच्या फ्लॅव्हिओ कोबोलीशी होईल. कोबोलीने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने दोन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या मारिन सिलिवर 6-4, 6-4, 6-7 (4-7), 7-6 (7-3) अशी मात केली.
अँड्रीव्हा, बेन्सिक उपांत्यपूर्व फेरीत
महिला एकेरीत रशियाच्या 18 वर्षीय सातव्या मानांकित मायरा अँड्रीव्हाने दहाव्या मानांकित एम्मा नेव्हारोचा 6-2, 6-3 असा पराभव करून शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 2007 नंतर या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती सर्वात तरुण खेळाडू बनली आहे. 2007 मध्ये निकोल वायडिसोव्हाने असा पराक्रम केला होता. आधीच्या फेरीत अँड्रीव्हाने विद्यमान विजेत्या बार्बरा क्रेसिकोव्हाचा पराभव केला होता. तिची पुढील लढत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकशी होईल. बेन्सिकनेही पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने 18 व्या मानांकित एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला. बेन्सिकने यापूर्वी तीनवेळा चौथ्या फेरीत पराभूत झाली होती. यावेळी तिने पाच मॅचपॉईंट्स वाया घालविले आणि सहाव्या वेळी तिला यश मिळाले. यापूर्वी 2019 यूएस ओपनमध्ये तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
19 व्या मानांकित ल्युडमिला सॅमसोनोवहानेही पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने जेसिका बुझास मॅनेरोवर 7-5, 7-5 अशी मात केली. सॅमसोनोव्हाने या स्पर्धेत एकही सेट गमविला नसून तिची पुढील लढत आठव्या मानांकित इगा स्वायटेकशी होणार आहे. स्वायटेकने क्लारा टॉसनचा 6-4, 6-1 असा पराभव केला.
भांब्री-गॅलोवे यांचे आव्हान समाप्त
युकी भांब्रीच्या दुहेरीतील पराभवाने भारताचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत रॉबर्ट गॅलोवेसमवेत खेळताना त्याला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या मानांकित स्पेनचा मार्सेल ग्रॅनोलर्स व अर्जेन्टिनाचा होरासिओ झेबालोस यांनी त्यांचा 6-4, 3-6, 7-6 (10-4) असा दोन तास 9 मिनिटांच्या संघर्षानंतर पराभव केला. पहिला सेट गमविल्यानंतर चौथ्या मानांकित भांब्री-गॅलोवे यांनी मुसंडी मारत दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली आणि निर्णायक तिसरा सेट सुपर टायब्रेकरपर्यंत लांबवला. सुपर टायब्रेकमध्ये ग्रॅनोलर्स-झेबालोस यांनी 7-0 अशी आघाडी घेतली. पण भांब्री-गॅलोवे यांनी मुसंडी मारत अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना 10-4 असा हा सेट गमवावा लागला आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले. रोहन बोपण्णा, एन. श्रीराम बालाजी, रित्विक बोलीपल्ली यांचे आव्हान याआधीच संपुष्टात आले होते.