गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित
कोल्हापूर :
गणेशोत्सव पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी योजना‘ कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून गणेश मंडळांनी परवानगीसाठी स्थानिक पोलीस ठाण्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले आहे.
यंदाचा गणेशोत्सवानिमित्त विविध नियोजनात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी योजना‘ कार्यान्वित करण्यात आली आहे. जिह्यात दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीचा गणेशोत्सव महाराष्ट्र शासनाने अधिकृत राज्य महोत्सव म्हणून घोषित केला असून, सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या हस्ते विधान भवनात त्याची अधिकृत घोषणा झाली आहे.
- नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
गणेश मंडळ आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय साधण्यासाठी नोडल अधिक्रायांची नेमणूक करण्यात आली असून, परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता यावर भर दिला जाणार आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्याचे कर्मचारी तिथे उपस्थित असणार आहेत. तरी शहरातील गणेश मंडळांनी या एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
- पारंपरिक उत्सवावर भर
प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पारंपरिक वाद्यांमधून लेझीम, ढोल, ताशा यांचा वापर करून उत्सवाचे पारंपरिक आणि सांस्कृतिक स्वरूप जपले जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लेझर लाइट्सचा वापर टाळावा, यासाठी जिल्हाधिक्रायांकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1) अंतर्गत आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- गौरी-गणेश विसर्जन आणि निर्माल्य व्यवस्थापन
2 सप्टेंबर रोजी गौरी व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून, विसर्जनासाठी प्रशासनाने विशेष कुंड, तलाव, विहिरी आणि नद्यांवर व्यवस्था केली आहे. निर्माल्य टाकण्यासाठी ट्रॉलींची उपलब्धता राहणार असून निर्माल्य नदीपात्रात टाकण्यास सक्त मनाई असणार आहे.
- स्पर्धांमध्ये सहभागी व्हा
जिल्हा पातळीवर विविध गणेशोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये सर्व मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.