गायक झुबीन गर्ग यांचा अपघाती मृत्यू
सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ सिंगापूर, गुवाहाटी
इमरान हाश्मीच्या ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग (वय 52 वर्षे) यांचा सिंगापूरमध्ये शुक्रवारी स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला. सिंगापूर दौऱ्यावर असताना त्यांना समुद्रातून वाचवण्यात आले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. त्यांच्या अचानक निधनाने चाहते आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झुबीन हे मूळचे आसाममधील एक दिग्गज गायक असले तरी त्यांनी मुंबईत राहून बॉलिवूडविश्वात आपले नाव कमावले होते.
प्रसिद्ध बॉलीवूड गायका झुबीन गर्ग यांच्या निधनाच्या बातमीने संगीत उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. सिंगापूर दौऱ्यावर असताना आनंद आणि साहसासाठी समुद्रात गेलेल्या या गायकासाठी हे एक भयानक स्वप्न ठरले. वृत्तानुसार, सिंगापूर पोलिसांनी गायकाला समुद्रातून वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, व्यापक उपचार आणि वैद्यकीय सेवा असूनही ते त्यांना वाचवू शकले नाहीत.
झुबीन 20 सप्टेंबर रोजी नॉर्थ-ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले होते. 20 आणि 21 रोजी त्यांची अदाकारी ठेवण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना तसेच आसाममधील लोकांना आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी आहे.
1995 मध्ये झुबीन गर्ग बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत त्यांनी पहिले इंडी पॉप सिंगल ‘चांदनी रात’ रिलीज केले. नंतर, त्यांनी ‘चंदा’ (1996), ‘जलवा’ (1998), ‘याही कभी’ (1998), ‘जादू’ (1999), ‘स्पर्श’ (2000) आणि इतर अनेक हिंदी अल्बम आणि रीमिक्स गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी ‘गद्दर’ (1995), ‘दिल से’ (1998), ‘डोली सजाके रखना’ (1998), ‘फिजा’ (2000) आणि ‘काँटे’ (2002) सारख्या चित्रपटांसाठी देखील गायन केले होते. मात्र, त्यांना बॉलिवूडमध्ये सर्वात मोठा ब्रेक ‘गँगस्टर’ या चित्रपटातील ‘या अली’ या गाण्यातून मिळाला. झुबीन गर्ग यांनी आसामी, हिंदी, बंगाली, कन्नड, उडिया, तमिळ, तेलुगू, पंजाबी, नेपाळी, मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत.