सिंगापूरच्या नौकेला केरळनजीक आग
वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
केरळनजीक समुद्रात अडकलेल्या सिंगापूरच्या मालवाहू नौकेमध्ये स्फोट झाला असून त्या स्फोटामुळे तिला आग लागली आहे. ही घटना सोमवारी कोझिकोडनजीकच्या बायपोरे येथे घडली. या नौकेवरील चार खलाशी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या नौकेच्या आतील बाजूस असणाऱ्या डेकवर ही आग लागल्याचे दिसून आले. ही नौका कोलंबो बंदरातून मुंबईच्या न्हावा शेवा बंदराकडे जात होती. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या नौकेवरुन स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले, अशी माहिती देण्यात आली आहे.
आग लागली तेव्हा ही नौका कोझिकोडपासून 350 किलोमीटर अंतरावर समुद्रात होती. एम. व्ही. वानहाई 503 असे या नौकेचे नाव आहे. ती 7 जूनला कोलंबो बंदरावरुन निघाली होती. या नौकेवर कंटेनरबंद माल होता. तसेच 22 कर्मचारी होते. त्यांच्यापैकी 18 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. नौकेला आग लागल्यानंतर या खलाशांनी छोट्या नौकेचा उपयोग करुन सुटका करुन घेतली. चार कर्मचारी बेपत्ता आहेत. आज मंगळवारी ती मुंबईला पोहचणार होती.
भारतीय नौकेचे मार्गपरिवर्तन
सिंगापूरच्या या नौकेला आग लागल्यानंतर त्याच मार्गावरुन जाणाऱ्या आयएनएन सुरत या भारताच्या युद्धनौकेला मार्ग परिवर्तन करावे लागले आहे. ही युद्धनौका कोची बंदराकडे येत होती. भारताच्या या नौकेवरुन डॉर्नियर हेलिकॉप्टर आग लागलेल्या नौकेच्या साहाय्यार्थ पाठविण्यात आले होते. नौकेवरची आग सोमवारी रात्री विझविण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे भारताने केरळपासून मंगळूरपर्यंतच्या आपल्या सर्व बंदरांवर दक्षता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या महिन्यातही अशीच घटना
गेल्या महिन्यातही लायबेरिया या देशाची नौकाही केरळच्या समुद्र तटावर अपघातग्रस्त होऊन बुडाली होती. त्या नौकेत विषारी रसायने असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे केरळ समुद्रतटानजीकचे पाणी विषारी होण्याचा धोका होता. या घटनेनंतर आता ही दुसरी नौकाअपघात घटना घडली आहे.