For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिनेर, स्वायटेक, स्विटोलिना, कीज उपांत्यपूर्व फेरीत

06:58 AM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिनेर  स्वायटेक  स्विटोलिना  कीज उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

रुने, मोनफिल्स, रायबाकिना, कुडेरमेटोव्हा पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / मेलबर्न

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनेर, बेन शेल्टन, पोलंडची इगा स्वायटेक, युक्रेनची स्विटोलिना, अमेरिकेची मॅडीसन कीज यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. होल्गर रुने, गेल मोनफिल्स, इव्हा लीस, इलिना रायबाकिना आणि रशियाची कुडेरमेटोव्हा यांचे आव्हान चौथ्या फेरीतच समाप्त झाले. रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला बेशिस्त वर्तन केल्याबद्दल दंड करण्यात आला.

Advertisement

पुरुष एकेरीच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड आणि विद्यमान विजेत्या जेनिक सिनेरने होल्गर रुनेचे आव्हान 6-3, 3-6, 6-3, 6-2 असे चार सेटमधील लढतीत संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. आतापर्यंत या दोन टेनिसपटूंमध्ये पाचवेळा गाठ पडली असून सिनेरने तीनवेळा तर रुनेने दोनवेळा विजय नेंदविले आहेत. मेलबर्नमध्ये सोमवारी हवामान अधिक उष्ण असल्याने टेनिसपटूंची दमछाक होत असल्याचे दिसून आले.

चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात बेन शेल्टनने गेल मोनफिल्सचा 7-6 (7-3), 6-7 (3-7), 7-6 (7-2), 1-0 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 2 तास 56 मिनिटे चाललेल्या या सामन्यातील चौथ्या सेटमध्ये मोनफिल्सला दुखापत झाल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. त्यामुळे पंचांनी शेल्टनला विजयी घोषित केले.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात पोलंडच्या माजी टॉपसिडेड इगा स्वायटेकने जर्मनीच्या इव्हा लीसचा 6-0, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. आतापर्यंत 5 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या स्वायटेकने या स्पर्धेत 10 गेम्स गमविले आहेत. दरम्यान, स्वायटेकने चौथ्या फेरीतील सामना केवळ 59 मिनिटांत जिंकला. आता नेव्हारो आणि कॅसेटकिना यांच्यातील विजयी खेळाडूंबरोबर स्वायटेकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.

अमेरिकेच्या मॅडिसन कीजने चौथ्या फेरीतील सामन्यातील सहाव्या मानांकित इलिना रायबाकिनाचे आव्हान 6-3, 1-6, 6-3 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या वर्षीच्या टेनिस हंगामात मॅडीसन कीजने अलिकडच्या काळात सलग 9 एकेरी सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. मॅडीसन कीजला यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांत कझाकस्थानच्या रायबाकिनाकडून पराभव पत्करावा लागला होता. मॅडीसन कीजचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना युक्रेनच्या इलिना स्विटोलिनाशी होणार आहे. युक्रेनच्या  स्विटोलिनाने चौथ्या फेरीतील सामन्यात रशियाचा व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेत स्विटोलिनाने 12 व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

मेदवेदेव्हला दंड

रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव्हला बेशिस्त वर्तनाबद्दल दंड करण्यात आला आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यावेळी एक गुण गमविल्यानंतर निराश झालेल्या मेदवेदेव्हने रागाने नेटवर रॅकेट भिरकवल्याने तेथे असलेल्या लहान कॅमेऱ्याची काच फुटून नुकसान झाले होते. या बेशिस्त वर्तनामुळे त्याच्यावर या स्पर्धेच्या शिस्तपालन समितीकडून दंड करण्यात आला आहे. आता मेदवेदेव्हला या गुन्ह्याबद्दल 76 हजार डॉलर्सचा दंड द्यावा लागणार आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसरी फेरी गाठणाऱ्या टेनिसपटूला सुमारे 123,000 डॉलर्सची रक्कम मिळत असते. मेदवेदेव्हकडून टेनिस कोर्टवर शिस्तपालन नियमाचा भंग दुसऱ्यांदा झाल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement
Tags :

.