सिनेर, स्वायटेक, फ्रिट्झ, डी मिनॉर तिसऱ्या फेरीत
बालाजी-व्हॅरेला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/मेलबोर्न
2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत इटलीचा टॉप सिडेड सिनेर, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ आणि ऑस्ट्रेलियाचा डी.मिनॉर यांनी तर महिला विभागात पोलंडची इगा स्वायटेक, नेव्हारो, कॅसेटकिना, रायबाकिना यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. पुरुष दुहेरीत भारताच्या एन. बालाजी आणि त्याचा मेक्सिकन साथीदार व्हॅरेला यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात विद्यमान विजेता आणि टॉप
सिडेड इटलीच्या जेनिक सिनेरने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना ऑस्ट्रेलियाचा वाईल्ड कार्डधारक ट्रिस्टेन स्कूलकेटीचा 4-6, 6-4, 6-1, 6-3 अशा सेटस्मध्ये पराभव केला. अलिकडच्या कालावधीत सिनेरने एकेरीच्या गेल्या 14 सामन्यात एकही सेट गमविलेला नव्हता. पण त्याला स्कूलकेटी बरोबरच्या सामन्यात एक सेट गमवावा लागला. सिनेरचा एकेरीच्या सामन्यातील हा सलग 16 वा विजय आहे. आता तिसऱ्या फेरीत सिनेरची गाठ मार्कोस गिरॉनशी होणार आहे.
अमेरिकेच्या चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झने दुसऱ्या फेरीतील सामन्यात ख्रिस्टेन गॅरीनचा 6-2, 6-1, 6-0 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. हा सामना 85 मिनिटे चालला होता. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरने दुसऱ्या फेरीतील सामन्यात बॉएरचा 6-2, 6-4, 6-3 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. मिनॉरने हा सामना दोन तासांच्या कालावधीत जिंकला. फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने जर्मनीच्या अल्टामेयरवर 7-5, 6-3, 7-6 (7-3)
अशी मात करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या डी. मिनॉरचा तिसऱ्या फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या सेरुनडोलोशी होणार आहे. तर फ्रिट्झची लढत रशियाच्या अव्वल डॅनिल मेदवेदेव्हशी होईल. ब्राझीलच्या फोनसेकाला इटलीच्या सोनेगोने पराभूत केले. या स्पर्धेत फोनसेकाने यापूर्वीच्या सामन्यात रशियाच्या नवव्या मानांकित रुबलेव्हला पराभवाचा धक्का दिला होता. फोनसेकाला सोनेगोने 6-7 (6-8), 6-3, 6-1, 3-6, 6-3 अशा पाच सेट्समध्ये पराभूत करत तिसरी फेरी गाठली. सोनेगोचा तिसऱ्या फेरीतील सामना हंगेरीच्या
फॅबियन मॅरोझसेनबरोबर होणार आहे. मॅरोसेनने दुसऱ्या फेरीतील सामन्यात 17 व्या मानांकित टिफोईवर मात केली होती. तसेच रुमानियाच्या होलगेर रुनेने इटलीच्या मॅटो बेरेटेनीचा चार सेटसमधील लढतीत पराभव करत पुढील फेरी गाठली आहे. पुरुष दुहेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सीकन साथीदार मिगेल एन्जल व्हेरेला यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना हॉलंडचा रॉबीन हॅश आणि कझाकस्थानचा नेडोव्हेसोव्ह यांचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली आहे. हा सामना 65 मिनिटे चालला होता. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि ऋत्विक बोलीपल्ली यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे.
स्वायटेक तिसऱ्या फेरीत
महिला एकेरीत पोलंडच्या माजी टॉप सिडेड इगा स्वायटेकने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. गुरुवारी दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने रिबेका श्रेमकोव्हाचा 6-0, 6-2 अशा सरळ सेटसमध्ये तासभराच्या लढतीत पराभव केला. या लढतीतील पहिला सेट स्वायटेकने केवळ 26 मिनिटांत जिंकला होता. दुसऱ्या एका सामन्यात इमा राडुकेनोने अमंदा अॅनिसिमोव्हाचा 6-3, 7-5 अशा फडशा पाडत तिसरी फेरी गाठली. स्वायटेक आणि राडुकेनो यांच्यात तिसऱ्या फेरीत गाठ पडेल. 2021 साली राडुकेनोने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. गेल्यावर्षी अमेरिकन
ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणाऱ्या इमा नेव्हारोने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना चीनच्या वेंग झीयुचा 6-3, 3-6, 6-4 असा फडशा पाडला. नेव्हारोचा तिसऱ्या फेरीतील सामना जेबॉरशी होणार आहे. जेबॉरने दुसऱ्या फेरीतील सामन्यात कॅमिला ओसोरिवोवर 7-5, 6-3 अशी मात केली. जेबॉरने आतापर्यंत तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. नवव्या मानांकित डेरिया कॅसेटकिनाने चीनच्या वेंग येफेनचा 6-2, 6-0, कझाकस्थानच्या पुतीनसेव्हाने चीनच्या झेंग शुईचा 6-2, 6-1 तर इलिना रायबाकिनाने अमेरिकेच्या 17 वर्षीय जोव्हिकचा 6-0, 6-3 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.