सिनर-कार्लोस अल्कारेझ अंतिम फेरीत
ऑगर अॅलियासिने,नोव्हॅक जोकोविच स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
इटलीचा अग्रमानांकित जेनिक सिनर व स्पेनचा दुसरा मानांकित कार्लोस अल्कारेझ यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली असून रविवारी या दोघांत जेतेपदासाठी लढत होईल. फेलिक्स ऑगर अॅलियासिमे व माजी चॅम्पियन नोव्हॅक जोकोविच यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
सिनरने फेलिक्स ऑगर अॅलियासिमेचा 6-1, 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. येथे तो सलग दुसरे जेतेपद मिळविण्याच्या समीप पोहोचला असून त्याला कार्लोस अल्कारेझचे आव्हान पार करावे लागणार आहे. त्याने या मोसमात सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी रॉजर फेडररने 2004 ते 2008 या कालावधीत सलग पाचवेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला असून त्याची पुनरावृत्ती अजून कोणाला करता आलेली नाही. एकाच मोसमात सिनर व अल्कारेझ सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. असा पराक्रम करणारे हे पहिले खेळाडू आहेत. याशिवाय अग्रस्थान पटकावण्यासाठीही दोघांत चुरस लागली आहे.
सिनरने सलग पाचव्यांदा स्लॅमची अंतिम फेरी गाठली आहे. मागील वर्षी त्याने अंतिम फेरीत टेलर फ्रिट्झचा तर यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत त्याने अलेक्झांडर व्हेरेव्हला हरवून जेतेपद पटकावले. तर जूनमध्ये झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये त्याला अंतिम फेरीत अल्कारेझकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर विम्बल्डनमध्ये त्याला हरवून सिनरने जेतेपद मिळविले होते. गेल्या 34 ग्रँडस्लॅम सामन्यांत सिनरने 33 विजय मिळविले आहेत.
अल्कारेझची जोकोविचवर मात
22 वर्षीय अल्कारेझने दुसऱ्या उपांत्य सामन्यात 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर 6-4, 7-6 (7-4), 6-2 अशी मात करून अंतिम फेरी गाठली. अल्कारेझने अलीकडे दोनदा जोकोविचकडून पराभूत झाला आहे, गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीत आणि यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत अल्कारेझ पराभूत झाला होता.
रविवारचा निकाल काहीही लागला तरी या दोघांनी मिळून मागील 13 पैकी 10 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. अल्कारेझने पाच तर सिनरने चार स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून अल्कारेझ सहावे जेतेपद मिळविण्याचा प्रयत्न करेल. 2024 च्या सुरुवातीपासून सिनरने अल्कारेझविरुद्ध एक विजय मिळविला तर अन्य कोणत्याही खेळाडूविरुद्ध त्याचे जय-विजयाचे रेकॉर्ड 109-4 असे आहे.
डाब्रोवस्की-रूटलिफ महिला दुहेरीत विजेत्या
तिसरे मानांकन मिळालेल्या कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की व न्यूझीलंडची एरिन रूटलिफ यांनी महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. तीन वर्षांत त्यांनी मिळविलेले हे दुसरे अजिंक्यपद आहे. त्यांना 10 लाख डॉलर्स बक्षीस मिळाले. अंतिम फेरीत त्यांनी अग्रमानांकित टेलर टाऊनसेन्ड व कॅटरिना सिनियाकोव्हा यांचा 6-4, 6-4 असा सहज पराभव केला. ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्याची टाऊनसेन्ड-सिनियाकोव्हा यांची ही पाचवी वेळ होती. ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारानंतर डाब्रोवस्कीने मिळविलेले हे पहिले स्लॅम अजिंक्यपद आहे. मागील वर्षी उपचार घेण्याचे लांबणीवर टाकून विम्बल्डन खेळण्यावर तिने लक्ष केंद्रित केले. तिने रूटलिफसमवेत त्यावेळी अंतिम फेरीही गाठली होती. पण टाऊनसेन्ड व सिनियाकोव्हा यांनी त्यांचा पराभव केल्याने डाब्रोवस्कीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.