सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत, तनिषा-ध्रुव पराभूत
वृत्तसंस्था / पॅरिस
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे महिला एकेरीतील आव्हान शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. या पराभवामुळे सिंधूचे विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहावे पदक मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांचे आव्हानही संपुष्टात आले तर पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानीने पी. व्ही. सिंधूचा 21-14, 13-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. हा सामना 64 मिनिटे चालला होता. सिंधूने 2019 साली विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच तिने या स्पर्धेत पाचवेळा पदके मिळविली आहेत. हैदराबादच्या 30 वर्षीय सिंधूने 2013 साली गुयांगझोयु येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर 2014 साली कोपनहेगन येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक घेतले होते तर 2017 च्या ग्लासगो स्पर्धेत उपविजेतेपद व 2019 च्या बेसील येथे झालेल्या स्पर्धेत सिंधूने सुवर्णपदक मिळविले होते. पी. व्ही. सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक तर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.
या स्पर्धेत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान मलेशियाच्या चेन जी आणि वेई यांनी संपुष्टात आणले. मलेशियाच्या चेन आणि वेई यांनी ध्रुव कपिला व तनिषा क्रॅस्टो यांचा 21-15, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी चीनच्या लियांग केंग आणि वेंग चेंग यांचा 19-21, 21-15, 21-17 अशा गेम्समध्ये फडशा पाडत आगेकूच केली.