For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकण रेल्वे: केवळ वाहतूक नव्हे,कोकणची 'अर्थवाहिनी'!

05:09 PM Oct 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कोकण रेल्वे  केवळ वाहतूक नव्हे कोकणची  अर्थवाहिनी
Advertisement

तिमाहीत सिंधुदुर्गातील स्थानकांतून मिळाला २३ कोटींहून अधिक महसूल; 'सावंतवाडी टर्मिनस' ठरणार 'गेम चेंजर.

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
कोकण रेल्वे ही केवळ प्रवाशांना मुंबई-गोव्यातून ने-आण करणारी वाहतूक व्यवस्था राहिलेली नाही, तर ती कोकणातील किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि प्रमुख 'अर्थवाहिनी' बनल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील (जुलै ते सप्टेंबर) प्रवासी वाहतूक आणि महसुलाची आकडेवारी हे सिद्ध करत आहे. ही स्थानके जिल्ह्याच्या सकल उत्पन्नात (GDP) थेट महसूल आणि गुंतवणुकीसोबतच, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे प्रचंड चालना देत आहेत.

थेट महसूल आणि गुंतवणूक
माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कोकण रेल्वे महामंडळाने सिंधुदुर्गातील केवळ चार प्रमुख स्थानकांतून तब्बल ₹२३.४९ कोटींहून अधिक महसूल केवळ तिकीट विक्रीतून मिळवला आहे. हा कोट्यवधींचा महसूल थेट जिल्ह्याच्या 'वाहतूक सेवा' क्षेत्राशी निगडित असल्याने याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच होत आहे.याशिवाय, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूकही महत्त्वाची ठरत आहे, ज्या मधे कोकणातील रेल्वे स्थानकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले.
--------------
पर्यटन आणि व्यापाराला अप्रत्यक्ष बळ !
रेल्वेचा खरा आणि दूरगामी परिणाम हा तिच्या अप्रत्यक्ष योगदानात आहे. याच तीन महिन्यांत या चार स्थानकांवर ५.१६ लाखांहून अधिक प्रवासी दाखल झाले.यात पर्यटक, सणांसाठी येणारे चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांचा मोठा समावेश आहे.हे प्रवासी जिल्ह्यात आल्यावर हॉटेल,स्थानिक वाहतूक, मालवणी खाद्यपदार्थ आणि स्थानिक् वस्तू (काजू, कोकम, आंबे) यांवर जो खर्च करतात, त्यातून स्थानिक बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते ज्यामुळे जिल्ह्याच्या सेवा क्षेत्राचा मध्ये वाढ होते
-----------
स्थानिक अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण !
त्याचप्रमाणे, याच तिमाहीत जिल्ह्यातील स्थानकांवरून ५.४९ लाखांहून अधिक प्रवाशांनी आपल्या परतीच्या प्रवास केला यात प्रामुख्याने मुंबई-पुण्याकडे नोकरी-व्यवसायासाठी जाणारा मोठा वर्ग आहे. हे लोक बाहेर कमावलेला पैसा जिल्ह्यात परत पाठवतात,ज्यामुळे स्थानिकांची क्रयशक्ती वाढते. तसेच, जिल्ह्यातील शेतीमाल मुख्यत्वे आंबा, काजू, फणस, कोकम आदी आणि मत्स्य उत्पादनांना मुंबईसारखी मोठी बाजारपेठा मिळवून देण्यात रेल्वेचा मोठा वाटा आहे
----------
'सावंतवाडी टर्मिनस' ठरणार विकासाची नांदी !
या संपूर्ण आर्थिक विकासात सावंतवाडी येथे होणारे रेल्वे टर्मिनस भविष्याची नांदी ठरणार आहे. जेव्हा एखाद्या स्थानकाचे 'टर्मिनस'मध्ये रूपांतर होते,तेव्हा तेथून नवीन, थेट गाड्या सुरू होऊ शकतात. यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ होईल. दळणवळणाची सुविधा अधिक मजबूत होईल,पर्यटनाला चालना मिळेल.याशिवाय, स्थानकाच्या आसपास लॉजिस्टिक्स, पार्सल सेवा,नवीन हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे जाळे उभे राहील, जे मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्माण करतील.थोडक्यात,ही आकडेवारी सिद्ध करते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानके ही केवळ 'प्रवासी' वाहून नेत नाहीत, तर ती 'पैसा' (महसूल), 'गुंतवणूक' (पायाभूत सुविधा) आणि 'समृद्धी' (पर्यटन व व्यापार) देखील जिल्ह्यात आणत आहेत. त्यामुळे, सावंतवाडी टर्मिनससारख्या प्रकल्पांमधील गुंतवणूक ही केवळ प्रवाशांची सोय नसून, ती कोकणातील जिल्ह्यांचा सर्वांगीण आर्थिक विकासाला गती देणारी एक धोरणात्मक गुंतवणूक आहे.त्यामुळे कोकणाचे हे टर्मिनस पूर्णत्वास जाणे हे कोकणवासीयांचा हिताचे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.