सिंधुदुर्ग -पुणे विमानसेवा आता आठवड्यातून पाच वेळा
फ्लाय ९१ने चिपी विमानतळावरून वाढवली सिंधुदुर्ग-पुणे उड्डाणांची संख्या
प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवा स्थित फ्लाय९१ विमानसेवेने सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही सेवा आठवड्यातून दोनदाच उपलब्ध होती. वाढलेली वारंवारता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील प्रवास अधिक सुलभ करणार असून, या भागातील पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक संपर्क वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे. सध्या फ्लाय९१ ही विमानसेवा कमी सुविधा असलेल्या भागांना इतर शहरांशी सहजपणे जोडण्यावर भर देत असून, या माध्यमातून प्रादेशिक विकासाला चालना देण्याचे कार्य करत आहे.विमानसेवेची वारंवारता वाढल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसायांना नव्या संधी मिळण्याची आणि आर्थिक व्यवहार अधिक गतिमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.