महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दक्षिण आफ्रिकेत धावणार सिंधुपुत्र

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयुष्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस मागे वळून पाहत नाही तर तो पुढे जातच राहतो. हेच तत्व बाळगत न थकता आणि न दमता त्याच जोशाने  दोन सिंधूपुत्र पळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत येत्या नऊ जूनला होणाऱ्या जगातील सर्वात जुन्या, मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ओंकार पराडकर आणि कुडाळ येथील भोईचा-केरवडे येथील येथील प्रसाद कोरगावकर धावणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटर मेरीसबर्ग या दोन शहरातून ही मॅरेथॉन असेल. दक्षिण आफ्रिकेतील सैनिकांच्या स्मरणार्थ असलेल्या या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे 90 किलोमीटर अंतर तब्बल 12 तासांच्या आत पार करायचे असते. या स्पर्धेत जगभरातून 35 हजार धावक तर भारतातून 400 धावक सहभागी होणार आहेत. अत्यंत कठीण आणि एकूण 1800 मीटर उंच चढण धावकांना पार करायची असते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धावकांना 42.2 किलोमीटरचे अंतर चार तासात पार करावे लागते आणि नंतरच संघात निवड होते. प्रसाद कोरगावकर यांनी 42.2 किलोमीटर अंतर 3 तास 5 मिनिटात तर ओंकार पराडकर यांनी 42.2 किलोमीटर अंतर 3 तास 56 मिनिटात पार करून आपली भारतीय संघात निवड पक्की केली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारे हे पहिलेच दोन धावक आहेत. 90 किलोमीटर अंतर पार करून देशासाठी मेडल आणण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. दोघेही सहा जूनला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत.

Advertisement

पाच महिन्यांपासून स्पर्धेची तयारी

Advertisement

दोघांनीही या स्पर्धेची तयारी पाच महिने आधीपासूनच सुरू केली, अशी माहिती धावक ओंकार पराडकर यांनी ‘तऊण भारत संवाद’ला दिली. ट्रेनिंग प्लॅननुसार पहाटे साडेचार वाजता उठून धावावे लागते. त्यांनी जवळपास एका महिन्यात 300 ते 400 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. तर एका आठवड्यात अंदाजे 120 किलोमीटर रनिंग करण्यात आले. यामध्येच एक लॉंग रन असून हा रन 30 किंवा 40 किलोमीटरचा असतो. आठवड्यात एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा मॅरेथॉनच्या तयारीसाठी वेगवेगळी ट्रेनिंग अॅक्टिव्हिटी करण्यात आली. आठवड्यातला एक दिवस धिम्या गतीने तर कधी तेज गतीत रन ठेवण्यात येतो. मॅरेथॉनमध्ये पळताना स्नायूंना क्रेम्प येऊ नये, यासाठी स्लो किंवा फास्ट रनची तयारी आधी करावी लागते, असे त्यांनी सांगितले. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये पळणारे बहुतांश धावक हे आपला जॉब सांभाळून या मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतात. त्यासाठी आहाराची बरीच पथ्ये पाळावी लागतात. जास्तीत जास्त फळांवर भर दिला जातो. त्याचप्रमाणे दूध, अंडी, मोड आलेली कडधान्ये, ड्रायफ्रूटचा आहारात समावेश करावा लागतो. तळलेले पदार्थ खाल्ल्याने अपचन लेव्हल वाढून धावताना त्रास झाल्यास तुमच्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी न होऊ देणे हेदेखील महत्वाचे आहे. कारण शरीर हायड्रेट राहणे गरजेचे असते, असेही ओंकार यांनी स्पष्ट केले.

पुणे मॅरेथॉनपासून प्रवास सुरू

ओंकार पराडकर हे सध्या पुणे येथील एका फॉरेन कंपनीत रेग्युलेटरी अफेअर्स मॅनेजर म्हणून कार्यरत असून प्रसाद कोरगावकर यांची नुकतीच ठाणे जिल्ह्यात वनरक्षकपदी निवड झाली आहे. आजकाल कार्पोरेट क्षेत्रात बैठ्या शैलीची कार्यपद्धती विकसित होत आहे. त्यामुळे स्थूलपणा वाढून वजन वाढत राहते. त्यामुळे वाढलेले हे वजन कमी करण्यासाठी पुण्यात झालेल्या मॅरेथॉनमध्ये आपण पहिल्यांदा सहभाग घेतला आणि तेथूनच हा प्रवास सुरू झाल्याचे पराडकर यांनी सांगितले.

246 किलोमीटरची रनवारी

प्रसाद आणि ओंकार यांनी 2022 मध्ये देहू ते पंढरपूर अशी 246 किलोमीटरची लांब पल्ल्याची रनवारी 53 तासात पूर्ण केली होती. ही आजवरच्या मॅरेथॉनपैकी सर्वात मोठी मॅरेथॉन आहे. तर 24 तासात होणाऱ्या वनटाईम स्टेडियम मॅरेथॉनमध्ये पराडकर यांनी 144 किलोमीटर अंतर पार केले. तर प्रसाद यांनी 12 तासात 95 किलोमीटर अंतर पार करून संपूर्ण देशात तिसरी रँक प्राप्त केली होती.

कुटुंबीय आणि कंपनीच्या पाठिंब्याने आवड जपतोय

पळताना तुम्ही एकटेच पळता. पण, मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागणाऱ्या सरावासाठी वेळेचे आणि मनावर दडपण नसणे गरजेचे असते. यासाठी कुटुंबियांनी आणि कंपनीने आपल्याला पाठिंबा दिला. तसेच खेळासाठी येणारा 80 टक्के खर्च कंपनीने उचलला. त्यामुळेच आजवर आपण अनेक मॅरेथॉन बिनधास्त धावू शकलो, असे पराडकर यांनी सांगितले.

सिंधुरनर्सच्या माध्यमातून अनेकांना प्रोत्साहन

सिंधुदुर्गातील धावकांना विशेष मार्गदर्शन लाभत नाही. मात्र, ओंकार पराडकर आणि अन्य धावक पुढे येत त्यांनी सिंधुदुर्गात सिंधुरनर्स टीमची स्थापना केली. त्या माध्यमातून आजवर अनेक धावक घडले. सिंधुदुर्ग आणि गोव्यात या सिंधुरनर्स टीमच्या माध्यमातून दरवर्षी अनेक मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले जात असते.

आनंद जपायला हवा!

तुम्ही जे काही करता त्यातून तुम्हाला मोबदला मिळाला नाही तरी आनंद मिळाला पाहिजे. हा आनंद खूप मोठा असतो आणि तोच आपल्याला घडवत असतो. त्यामुळे तुमच्या कामातून मिळणारा हा आनंद जपता आला पाहिजे. मॅरेथॉनकडे करिअर म्हणून न पाहता केवळ स्वत:च्या आनंदासाठी यापुढेही सहभागी होत राहणार, असे पराडकर सांगतात. तर प्रसाद कोरगावकर हे  मॅरेथॉनकडे करिअर म्हणून पाहतात. प्रसाद यांच्यासारखा धावक सिंधुदुर्गात शोधून सापडणार नाही. अशी एकही रन नाही की जिथे आपण आणि प्रसाद धावलो नाही, असे यावेळी पराडकर यांनी सांगितले.

-अनुजा कुडतरकर, सावंतवाडी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article