For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीव्ही सिंधू, त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद दुसऱ्या फेरीत

06:08 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीव्ही सिंधू  त्रीसा जॉली गायत्री गोपीचंद दुसऱ्या फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

Advertisement

ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मूरवर तिने विजय मिळविला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही दुसरी फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱ्या सिंधूने उबेर कप व थायलंड ओपन स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तिने गिल्मूरवर 21-17, 21-16 अशी 46 मिनिटांत सहज मात केली. गिल्मूर ही जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर आहे. येथे पाचवे मानांकन मिळालेल्या सिंधूची पुढील लढत कोरियाच्या सिम यु जिनशी होईल. सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली होती. तिने जिंकलेली ती याआधीची शेवटची स्पर्धा होती.

Advertisement

बी. सुमीत रेड्डीr व एन. सिक्की रेड्डी या जागतिक 53 व्या मानांकित जोडीनेही दुसरी फेरी गाठली असून त्यांनी मिश्र दुहेरीच्या लढतीत हाँगकाँगच्या लुइ चुन वेइ व फु चि यान यांच्यावर 21-15, 12-21, 21-17 अशी 47 मिनिटांत मात केली. या पती-पत्नीची पुढील लढत मलेशियाच्या अग्रमानांकित चेन टँग जी व तोह ई वेई यांचे आव्हान परतवण्याची कठीण कामगिरी करावी लागणार आहे.

सिंधूने गिल्मूरवर मिळविलेला हा तिसरा विजय आहे. गिल्मूरने राष्ट्रकुल स्पर्धेत दोनदा पदके मिळविली आहेत. 28 वर्षीय सिंधूने या लढतीत पहिल्या गेममध्ये झटपट 7-1 अशी आघाडी घेतली. पण गिल्मूरने तिला 14-14 व 15-15 वर गाठले. पण सिंधूने नंतरचे आठपैकी सहा गुण घेत तिला वरचढ होऊ न देता पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने 3-0 अशी आघाडी घेत वर्चस्व कायम राखत गिल्मूरला वरचढ होऊ दिले नाही. ब्रेकवेळी सिंधू 11-6 अशी पुढे होती. ही आघाडी नंतरही कायम राखत आठ मॅचपॉईंट्स मिळविले. त्यापैकी चार गिल्मूरने वाचवले. पण सिंधूने आरामात हा गेम घेत सामना संपवला.

गुडघ्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर यावर्षी सिंधूला अनेक स्पर्धांत पराभवाला सामोरे जावे लागले. येथे चांगले प्रदर्शन करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी आत्मविश्वास वाढविण्याचा ती प्रयत्न करीत आहे.

भारताच्या त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली. एकेरीच्या पात्रता फेरीत मात्र भारतीयांनी निराशाजनक कामगिरी केली.

त्रीसा-गायत्री दुसऱ्या फेरीत

त्रीसा-गायत्री यांनी चिनी तैपेईच्या हुआंग यु सुन व लियांग टिंग यु यांच्यावर 21-14, 21-10 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत हुआंग व लियांग 104 व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत भारताच्या चारपैकी एकाही खेळाडूला मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविता आले नाही. सतीशकुमार करुणाकरणने गेल्या डिसेंबरमध्ये ओडिशा मास्टर्स सुपर 100 स्पर्धा जिंकली होती. येथे त्याने मलेशियाच्या चीआम जुन वेईचा 21-15, 21-19 असा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो इंडोनेशियाच्या शेसार ऱ्हुस्तावितोकडून 21-13, 20-22, 13-21 असे पराभूत झाला.

Advertisement
Tags :

.