For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलेशिया मास्टर्समध्ये सिंधूला उपविजेतेपद,

06:24 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मलेशिया मास्टर्समध्ये सिंधूला उपविजेतेपद
Advertisement

 वृत्तसंस्था/ क्वालालंपूर

Advertisement

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने रविवारी येथे मलेशिया मास्टर्स फायनलच्या निर्णायक लढतीत जागतिक सातव्या मानांकित चीनच्या वांग झी यीविऊद्ध घेतलेली 11-3 अशी भक्कम आघाडी गमावली आणि विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी हातची घालविली. चषक तिच्या आवाक्यात होता. परंतु जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला 79 मिनिटांत शेवटी 21-16, 5-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या पाचव्या मानांकित सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ओपन आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये अखेरचे सुवर्ण जिंकले होते, तर 2023 मध्ये माद्रिद स्पेन मास्टर्समध्ये उपविजेतेपद पटकावले होते. हे जेतेपद प्राप्त झाल्यास ते अंतिम फेरीपर्यंतच्या तिच्या प्रभावी वाटचालीस साजेसे शिखर ठरले असते. तसेच पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी तिचा आत्मविश्वास वाढला असता. एका वर्षाहून अधिक काळानंतर जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूरवरील स्पर्धेत सहभागी होण्याची ही तिची पहिलीच खेप होती.

Advertisement

सिंधूने आशियाई विजेत्या वांगविऊद्ध सामन्याच्या बहुतांश भागांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी शांतपणे मुकाबला केला आणि सामर्थ्याचा चांगला वापर केला. परंतु निर्णायक क्षणी तिच्या हातातून ट्रॉफी निसटली. सिंधूला गेल्या वर्षी आर्क्टिक ओपनमध्येही वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु तिने तीन सामन्यांमध्ये दोनदा या चिनी खेळाडूंचा पराभव केला होता.

Advertisement
Tags :

.