सिंधू, प्रणॉय यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था / सिंगापूर
येथे सुरू असलेल्या सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी विजयी सलामी दिली. सिंधूने कॅनडाच्या वेन यु झांगवर केवळ 31 मिनिटांत 21-14, 21-9 असा विजय मिळविला.
सिंधूचे पुढील फेरीतील लढत माजी विश्वविजेती टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन यु फि हिच्याशी होईल. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानावर असलेल्या एच. एस. प्रणॉयनेही विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. यासाठी त्याला संघर्शा करावा लागला. डेन्मार्कच्या वरिष्ठ मानांकित 32 वर्षीय रासमुसला प्रणॉयने 19-21, 21-16, 21-14 असे पराभूत करुन विजयी सलामी दिली. त्याचा पुढील सामना फ्रान्सच्या क्रिस्टोव्ह पोपोव्हशी होणार आहे.
भारताच्या उर्वरित बॅडमिंटनपटूंची कामगिरी निराशाजनक झाली. मालविका बनसोड, अनमोल खर्ब, प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांना एकेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मालविकाला थायलंडच्या आठव्या मानांकित सुपानिदा काटेथोंगकडून 21-14, 18-21, 11-21 असा तर प्रियांशूला सातव्या मानांकित जपानचा शटलर कोदाई नाराओकाकडून 21-14, 10-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला.
अनमोलला चेनकडून 11-21, 22-24 असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या गेममध्ये अनमोलने कडवा प्रतिकार केला. पण तिला हार पत्करावी लागली. वर्षाच्या सुरुवातीला इंडिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या किरण जॉर्जला चीनच्या वेंग हाँग यांगकडून 19-21, 17-21, आर. संतोष रामराजला दक्षिण कोरियाच्या किम गा युनकडून 14-21, 8-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांना चीनच्या चेंग झिंग आणि झांग ची यांनी 18-21, 13-21, अशिथ सूर्या व अमृता परमुथेश यांचा जपानच्या युची शिमोगामी आणि सायाका होबारा यांनी 11-21, 17-21 असा तर महिला दुहेरीत कविप्रिया सेल्वम आणि सिमरन सिंग या जोडीला कोरियाच्या बाएक हा ना आणि ली सो ही यांनी 4-21, 9-21 असे नमवित त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.