सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का
लक्ष्य सेन,मालविका बनसोड, किरण जॉर्ज, आकर्षी कश्यप, उन्नती हुडा यांचे विजय
वृत्तसंस्था/ वान्ता, फिनलँड
येथे सुरू असलेल्या अर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडने तैपेईच्या जागतिक 23 व्या मानांकित सुंग शुओ युनला युनचा धक्कादायक पराभव करून दुसरी फेरी गाठला. याशिवाय लक्ष्य सेननेही पहिल्या फेरीत विजय मिळविला तर पीव्ही सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तसेच उन्नती हुडा व आकर्षी कश्यप यांनीही दुसरी फेरी गाठली.
23 वर्षीय मालविकाने गेल्या फेब्रुवारीत अझरबैजान इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून पहिले जेतेपद पटकावले होते. तिने युनविरुद्ध जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करीत 21-9, 24-22 असा केवळ 57 मिनिटांत पराभव केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मालविकाची ताकद वाढत असल्याचेच या विजयावरून दिसून येते. दुसऱ्या फेरीत मात्र तिला कठीण प्रतिस्पर्धी मिळाली असून रॅत्चानोक इंटेनॉन व चीनची वांग झी यि यापैकी एकीशी होईल.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच खेळणाऱ्या पीव्ही सिंधूला पहिल्या लढतीत पराभूत व्हावे लागले. तिला कॅनडाच्या मिशेली ली हिने 21-16, 21-10 असे हरविले. नवे प्रशिक्षक अनूप श्रीधर व कोरियाचे ली सून यांच्या मार्गदर्शनाखालील सिंधूचा हा पहिलाच सामना होता. मिशेली व सिंधू यांच्यात आतापर्यंत 14 लढती झाल्या असून त्यापैकी मिशेलीने फक्त चार सामने जिंकले आहेत. भारताच्या उन्नती हुडाने ब्राझीलच्या ज्युलियाना व्हायना व्हिएरावर 21-16, 23-25, 21-17 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला तर आकर्षी कश्यपने जर्मनीच्या वायव्होन लि हिचा 21-19, 21-14 असा 45 मिनिटांत पराभव केला.
किरण जॉर्ज, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत
अन्य सामन्यात किरण जॉर्जने पात्रता फेरीत फ्रान्सच्या लुकास कॅलेरबाऊटवर 21-16, 13-21, 21-19 अशी मात करून मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले. सतीश कुमार करुणाकरनची मोहिम मात्र पहिल्या फेरीत समाप्त झाले. त्याला फ्रान्सच्या अरनॉड मर्केलकडून 6-21, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र करुणाकरन व त्याची साथीदार आद्या वरियथ यांनी मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. त्यांनी इस्टोनियाच्या मिक ओऊनमा व रमोना उपरस यांचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात लक्ष्य सेननेही आगेकूच केली. रारमुस गेम्केने पहिल्या फेरीच्या लढतीतून माघार घेतल्याने सेनला पुढे चाल मिळाली. त्याची पुढील लढत तैपेईचा सातवा मानांकित चोऊ तिएन चेन किंवा अरनॉल मर्केल यापैकी एकाशी होईल.